सोलापूर - रविवार (4 जुलै) रोजी सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पोलीस प्रशासन आणि मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांमध्ये मोठे तणाव किंवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्या अनुषंगाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मराठा आरक्षणासाठी जो मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, तो पोलीस प्रशासनाकडून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे केल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल. यांनातर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहिल, असा इशारा निंबाळकर यानी दिला.
हेही वाचा - आमदार पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक
पोलीस प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. पोलीस प्रशासनाच्या कोणत्याही आदेशाला न जुमानता अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जाणार आहे.
मराठा क्रांती मोर्चातील सदस्यांना पोलिसांकडून दमदाटी -
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोलापुरात विविध निर्बंध लादले आहेत. जमावबंदी आणि संचारबंदी असे नियम गेल्या 28 जूनपासून सुरू झाले आहेत. तरीही 4 जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाच्या अरक्षणासाठी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा रोखण्यासाठी सोलापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने मराठा क्रांती मोर्च्यातील सदस्यांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप केला जात होता. यावर निंबाळकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आक्रोश मोर्चा चिघळण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही शांतीने मोर्चा काढणार आहोत, असे निंबाळकर यांनी सांगितले.
परजिल्ह्यातील पोलिसांच्या तुकड्या दाखल -
सोलापूर शहरात संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आक्रोश मोर्चाची सुरुवात होणार आहे. पोलीस परवानगी नसताना देखील मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे, सोलापुरातील पोलीस प्रमुखांनी सांगली, उस्मानाबाद, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील पोलिसांच्या तुकड्या मागविल्या आहेत. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी रविवारी कडक संचारबंदी घोषित केली आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे, ग्रामीण भागातून येणाऱ्या मराठा बांधवाना शहरात प्रवेश मिळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
हेही वाचा - रात्र गेली हिशोबात! पोरगं नाही नशिबात; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका