सोलापूर - खासगी सावकारांच्या वाढत्या संख्येमुळे तसे त्यांच्यापासून होणाऱ्या उपद्रवामुळे कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. खासगी सावकार अनेकांना ज्यादा व्याजदराने रक्कम देत आहेत. तसेच वसूलीसाठी नारिकांना मानसिक त्रास देत आहेत. अनेक उद्योजक व छोटे व्यवसायिक या खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवण्याचा वाटेवर आहेत. असाच एक प्रकार 13 जुलैला घडला. अमोल जगताप नामक व्यक्तीने खासगी सावकारांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत सर्व कुटुंबाचा विनाश केला आहे. या प्रकरणात 5 खासगी सावकारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन दिले.
अमोल जगताप यांनी 13 जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली; व कुटुंबातील सर्व सदस्यांना ठार केले. हे सर्व कृत्य खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पाच संशयितांना अटक झाली आहे.
मराठा क्रांती मोर्चा या प्रकरणावर आक्रमक झाला आहे. या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना भेटून निवेदन दिले. जगताप कुटुंब आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अटक झालेले काही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वी संबंधित आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यांनी अमोल जगताप यांच्या पत्नीस अश्लील शिवीगाळ करत व्याजाचे पैसे नाही दिले तर तुझ्या पत्नीस घेऊन जाऊ अशी धमकी देखील दिली होती.
समाजामध्ये होणारी बदनामी आणि खासगी सावकारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून शेवटचा पर्याय म्हणून अमोल जगताप या हॉटेल चालकाने 13 जुलै रोजी सायंकाळी पत्नीस ठार केले व दोन मुलांना देखील फासावर लटकवून संपवले.
या घटनेने सोलापूर शहर हादरले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेऊन एकूण 5 आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.