सोलापूर - भीक मागण्यासाठी एका महिलेने तीन वर्षीय बाळाचे अपहरण (Kidnapping child for begging) केले होते. याबाबत 19 फेब्रुवारी 2022 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी कसून तपास करत 20 फेब्रुवारी रोजी तीन वर्षीय बाळाची सुखरूप सुटका केली आणि यासमीन महिबूब बागवान (वय 35 ,रा, गोंधळे वस्ती, सोलापूर) या संशयित आरोपी महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लहान मुलांसोबत असलेल्या महिलांना अधिक प्रमाणात भीक मिळते, म्हणून या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. रमजान उर्फ बाबा(वय 3 वर्ष, रा, सिद्धार्थ नगर सोलापूर) असे अपहरण झालेल्या बाळाचे नाव आहे. बाळाची आई अंबिका उर्फ रेश्मा ही अंध आहे, याचाच गैरफायदा घेत बाळाला वडा पावचे अमिश दाखवून अपहरण केले होते.
बाळाची आई देखील भिक्षेकरी-
अंबिका उर्फ रेश्मा ही अंध महिला भीक मागून स्वतः ची आणि आपल्या तीन वर्षीय बाळाची उपजीविका भागवत होती. यासमीन बागवान हि महिला सुद्धा सोलापूर शहरातील विविध ठिकाणी भीक मागण्याचे काम करत होती. पण बाळाला सोबत घेऊन भीक मागत उभे राहिल्यास नागरिक मोठ्या मनाने दान करतात.यामुळे यास्मिन बागवान ही अंबिका उर्फ रेश्मा याच्या बाळावर नजर ठेवून होती.
अन्नधान्य वाटप करत आहेत अशी थाप मारून घेऊन गेली-
यास्मिन बागवान हिने अंबिका उर्फ रेश्माला 19 फेब्रुवारी रोजी सकाळी सांगितले की, सोलापूर शहरातील विजापूर वेस येथे दानशूर व्यक्ती गोरगरीबाना अन्नधान्य वाटप करत आहेत. रेश्मा हिने आपल्या बाळाला सोबत घेऊन यास्मिन सोबत गेली. आणि अन्नधान्य वाटप करतील या अपेक्षेने बसली. पण अंध असल्याने त्याला काहीही कळत नव्हते आणि दिसत नव्हते.
वडापावसाज अमिश दाखवून तिने बाळाला पळविले-
यास्मिन बागवान हिने रमजान उर्फ बाबा याला वडापावचे अमिश दाखवून विजापूर वेस येथून पळवून घेऊन गेले. अंबिका उर्फ रेश्मा या अंध महिलेला काही तासानंतर ही बाब कळाली. त्याने आपल्या भावाला हकीकत सांगितली आणि याबाबत 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सदर बाजार पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
भीक मागणाऱ्या महिलांची चौकशी करत बाळाचा शोध-
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी चौकशीची सुरुवात केली. आणि शहरातील भिक्षा मागणाऱ्या महिलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तपासात एका महिलेने माहिती दिली की, यास्मिन बागवान ही महिला लहान बाळाच्या शोधात होती. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने तीन वर्षीय रमजान उर्फ बाबा याला उषा नगर येथील एका पत्रा शेड मध्ये लपवून ठेवले आहे. पोलिसांनी ताबडतोब 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्या ठिकाणी जाऊन तीन वर्षीय बाळाला सुखरूप ताब्यात घेतले. आपले बाळ सुखरूप असल्याची माहिती मिळताच आई अंबिका उर्फ रेश्मा या अंध महिलेने सुटकेचा श्वास सोडला.
ही कामगिरी सदर बाजार पोलिसांनी पार पाडली-
भीक मागून आपली उपजीविका चालवणाऱ्या महिलेचे बाळ हे आपले बाळ समजून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने शोध केला. त्यामध्ये पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पोपटराव धायतोंडे, एपीआय सावंत, हेड कॉन्स्टेबल इसाक नदाफ, सागर सरतापे, रामा भिंगारे, अब्रार दिंडोरे, बाबा भोसले यांनी ही कामगिरी पार पाडली.