सोलापूर - शहरात असलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या वसूलदारांनी थकीत कर्जदारास दुचाकीचा हप्ता न भरल्याने बेल्टने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. जखमी नागनाथ बंडगर यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले आहे. या मारहाणीमुळे दुचाकीधारकाच्या घरात व कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागनाथ महादेव बंडगर(वय 19 ,रा. चिंचोळी, ता, अक्कलकोट, जि सोलापूर) असे जखमी तक्रारदाराचे नाव आहे. 2 सप्टेंबरला सायंकाळी 4 .30 च्या सुमारास तक्रारदार नागनाथ हे कामानिमित्त जुळे सोलापूर येथील कामाची ठिकाणी गेले होते. नागनाथ बंडगरकडे त्यांच्या मामाची दुचाकी (एम एच 13- सी एन 9729) हे वाहन होते. मामाने दुचाकी वाहन बजाज फायनान्स या कंपनीकडून हप्त्यावर घेतले होते. परंतू लॉकडाऊन लागू झाल्या पासून या वाहनाचे हप्ते थकीत झाले होते.
बजाज फायनान्स कंपनीचे वसूलदार या दुचाकी वाहनावर लक्ष ठेवून होते. शहरामध्ये येताच त्याचा पाठलाग करत ते जुळे सोलापूर या ठिकाणी गेले. 2 ऑक्टोबरला सायंकाळी दुचाकी वाहनाकडे जाऊन बजाज फायनान्सच्या वसुलधारकांनी दुचाकीधारकास बोलावून घेतले. या वाहनाचे हप्ते थकीत आहेत. हे वाहन कंपनीकडे जमा करावे लागेल, अशी माहिती दिली. दुचाकीस्वाराने त्या वसूलधारकांना उत्तर देत सांगितले की,हे दुचाकी वाहन माझ्या मामाचे आहे. मी तात्पुरते वापरत आहे. तुम्ही त्यांकडून जमा करून घ्या. यावरून दोघांत वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले, व बजाज फायनान्सच्या वसूलधारकांनी बेल्टने मारहाण करण्यात सुरुवात केली. या मारहाणीनंतर वसुलीसाठी आलेल्या दोघांनी दुचाकी वाहन घेऊन गेले व कंपनीच्या गोडावूनमध्ये जमा केले.
काही वेळाने तक्रारदार नागनाथ बंडगर याचे मामा घटनास्थळी आले व त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून हकीकत सांगितली. पोलिसांनी मारहाणीत जखमी झालेल्या नागनाथ यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. शनिवारी 3 ऑक्टोबरला रात्री उशिरा याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात बजाज फायनान्सच्या दोन अनोळखी वसूलधारकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल उपासे करत आहेत.
लॉकडाऊन नंतर फायनान्स व बचत गटवाल्यांचा थकीत हप्त्यासाठी तगादा
लॉकडाऊनमुळे मोठ-मोठे उद्योजक जेरीला आले आहेत. अनेकांची उद्योग डबघाईला आले आहेत. अनेक नागरिकांची कर्जे थकीत झाले आहेत. परंतु बचतग आणि फायनान्सवाले कोणत्याही प्रकारची दया न दाखवता वसुली सुरू केली आहे. ज्यामुळे मानसिक ताण वाढला आहे. बजाज फायनान्स कंपनीच्या वसुलीपथकाने बेल्टने मारहाण केल्याने याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. या विरोधात मोठे आंदोलन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.