सोलापूर - मुख्य शहरातील रस्त्यांवर दिवसा होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय शहर वाहतूक शाखेने घेतला आहे. रविवारी दुपारी सोलापूर-अक्कलकोट महामार्गवर एका टेम्पोने दुचाकीस्वरास धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आहे. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी आदेश काढून दिवसा शहरातून होणाऱ्या जडवाहतुकीवर बंदी घालण्यात आलीय.
महामारी सुरू झाल्यापासून सोलापूरात ताळेबंदी घोषित करण्यात आली होती. 22 मार्च ते 31मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू होते. त्यामुळे शहरात वाहतूक कमी झाली होती. शासनाने अत्यावश्यक सेवांना परवानगी देत मोठ्या वाहनांच्या वाहतुकीस परवानगी दिली होती. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत दिवसाढवळ्या मोठी वाहने शहरातून जात होती.
वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी 3 वर्षांपूर्वी जड वाहतूक बंद करण्यात आली. शहराला बायपास किंवा रिंग रोड नसल्याने ट्रक, कंटेनर, टेम्पो शहराच्या मधूनच जात होते. हैद्राबाद मार्गे, पुणे मार्गे व दक्षिण भारतातून येणाऱ्या जड वाहनांना दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने शहरातील मध्यवर्ती भागातून जात होते. त्यामुळे अनेक दुचाकी धारकांना अपघातात प्राण गमावावे लागले. मात्र आता शहर पोलीस प्रशासनाने अपघात रोखण्यासाठी जड वाहतुकीवर दिवसा बंदी आणत फक्त रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जड वाहतुकीस परवानगी देण्यात आली होती.
लॉकडाऊनमुळे या नियमांत शिथिलता आणून दिवसा देखील जड वाहतूक होत होती. आता पुन्हा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी आदेश काढला आहे. हाय-वे वरून येणारी जडवाहने रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत शहरातून जाऊ शकतात. सोलापूरातील व्यापाऱ्यांचे माल जड वाहनात सामान असल्यास त्यांनी मूळ बिलं दाखवून दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत शहरात जडवाहन घेऊन येऊ शकतात.