सोलापूर - कोरोना महामारीची तिसरी लाट रोखण्यासाठी लहान मुलांवर लक्ष अधिक केंद्रित केले जात आहे. त्यासाठी सामाजिक संस्था, विविध पक्ष आणि आरोग्य प्रशासन 0 ते 15 वयोगटातील लहान मुलांची काळजी घेत आहे. आज सकाळी एमआयएम पक्षाच्या वतीने सोलापूर शहरात जवळपास एक हजार लहान मुलांची आरोग्य तपासणी आणि कोविड तपासणी करण्यात आली. यामध्ये संशयित लक्षणे असणाऱ्या लहान मुलांवर ताबडतोब उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांनी दिली. शहरातील बालरोग तज्ञांनी देखील शहरात मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून देशाच्या उज्वल भविष्याचे आरोग्य सुरक्षित करण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा - सोलापुरात शनिवारी 475 कोरोना बाधित रुग्णांची वाढ;23 मृत्यू
शहरातील एक हजार लहान बालकांची कोविड तपासणी
एमआयएम पक्षाच्या वतीने मेडिकल विंग मार्फत शहरातील किडवाई चौक येथे आरोग्य शिबीर तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. हे आरोग्य शिबीर फक्त लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आले होते. कोरोनाची तिसरी लाट येणार आहे आणि या लाटेत सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने फक्त लहान मुलांसाठी आरोग्य शिबीर व कोविड तपासणी करण्यात आली. जवळपास एक हजार बालकांची तपासणी करण्यात आली. कोविड सारखे सौम्य लक्षणे असलेल्या बालकांवर उपचार देखील सुरू करण्यात आले.
तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न करावे - फारूक शाब्दी
गेल्या वर्षी कोरोनाची पाहिली लाट येऊन गेली. यामध्ये वृद्धांना अधिक फटका बसला होता. अनेक वृद्ध नागरिक पहिल्या लाटेत दगावले. मार्च 2021 पासून दुसरी लाट सुरू झाली. दुसऱ्या लाटेत तरुण आणि मध्यम वयातील नागरिकांना याची लागण झाली होती. आता काही महिन्यांत तिसरी लाट येणार आहे. त्यामध्ये लहान बालकांना याचा सर्वाधिक धोका असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. लहान मुले ही देशाचे उज्वल भविष्य आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांनी शहर आणि जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन एमआयएमचे जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी केले. तसेच, इतर पक्षांनी देखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही एमआयएम पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी व्यक्त केले. यावेळी पलेखान पठाण, मजहर कुरेशी, नगरसेवक गाजी जहागीरदार आदी उपस्थित होते.
हेही वाचा - सानेन बकरीचे राज्यात पैदास केंद्र उभारणार, पशुसंवर्धन मंत्र्यांची माहिती