सोलापूर- लॉकडाऊन झाल्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. अनलॉकमध्ये अवैध धंद्यांना पेव फुटला असून गुटखा माफियांनी शहरात एकच धुमाकूळ घातला आहे. दरम्यान फौजदार चावडी पोलिसांनी शहरातील गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी 6 गुटखा माफियांवर कारवाई केली आहे.
यामध्ये महेश मल्लिनाथ कटरे, मल्लिनाथ कृष्णा कटरे, शौकत मौलासाब अत्तार, आलम शौकत अत्तार, धरप्पा शरणप्पा जकापुरे, सिद्धराम शरणप्पा जकापुरे उर्फ अप्पी, यांना अटक करून 4 लाख 79 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच या अटक केलेल्या संशयित आरोपींनी कारवाई केलेल्या पोलिसांसोबत हमरीतुमरी केली. त्यामुळे सदर आरोपींवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा देखील गुन्हा दाखल केला आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलिसांनी माहिती मिळाली होती की, शहरातील गुटखा माफिया मल्लिनाथ कटरे याच्याकडे पिस्तुल व जिवंत काडतुसे आहेत. गुरुवारी दुपारी पोलीस ती पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त करण्यासाठी गेले. त्यावेळी संशयित आरोपी हे वारद चाळ येथे सुगंधित तंबाकू व गुटखा विक्री करत होते. पोलिसांनी त्या ठिकाणी असलेला 1 लाख 1 हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त केला.
मल्लिनाथ कटरे याची तपासणी व चौकशी केली असता त्याने, शौकत अत्तार,आलम अत्तार, धरप्पा जकापुरे, सिद्रामप्पा जकापुरे यांच्यासोबत मिळून गुटखा व्यवसाय करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर जकापुरे याचे भवानी पेठ येथील गल्लीमध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी 3 लाख 77 हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. असा एकूण 4 लाख 79 हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच सहा संशयित आरोपींना गुरुवारी दुपारी फौजदार चावडी पोलिसांनी ताब्यात घेतले.