सोलापूर - कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहर आणि जिल्ह्यात मास्कची सक्ती करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालिका आणि जिल्हा प्रशासनाला केल्या. पालकमंत्री दत्ता भरणे यांनी स्वतः सोलापूर शहरात मास्क वाटप केले.
सोलापूर शहरातील वॉर्ड 15 मध्ये 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेच्या पाहणीदरम्यान पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी महापौर कांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, नगरसेवक चेतन नरोटे, वैष्णवी करगुळे, विनोद भोसले, उपायुक्त धनराज पांडे, संतोष पवार, मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. शीतल जाधव आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे यांनी बोलताना सांगितले, की कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक नागरिकांनी आपली आणि कुटुंबाची जबाबदारी ओळखून मास्कचा वापर करायला हवा. वारंवार हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा. गर्दीत जाणे टाळा. लहान मुले आणि वृद्धांची काळजी घ्या. त्यांना गर्दीत जावू देऊ नका. प्रत्येकाने आपले कुटुंब निरोगी राहण्यासाठी पुढाकार घेतला तर ही मोहीम यशस्वी होईल.
जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सर्व नागरिकांची साथ हवी. ग्रामीण नागरिकांनीही आपली आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यायला हवी. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे योग्य पालन केले तरच कोरोनाला दूर ठेवता येते. प्रशासकीय पातळीवर रूग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नसल्याची खात्री भरणे यांनी दिली. नागरिकांचा या मोहिमेत सहभाग महत्वाचा आहे. माणूस जगविण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम लोकचळवळ निर्माण करावयची आहे. लोकप्रतिनिधींनी जनजागृतीचे काम करण्याचे आवाहनही भरणे यांनी केले.
मास्कची सक्ती गेल्या 5 महिन्यापासून होत आहे. सद्यस्थितीत सोलापूरमध्ये पोलीस प्रशासनाकडून मास्कची सक्ती किवा अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहराच्या सात ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत विना मास्कधारकांवर कारवाई होत आहे. मास्क वापरण्याच्या कारणावरून नागरिक व पोलीस प्रशासनात शाब्दिक चकमक होत आहे. पालकमंत्री यांनी देखील शनिवारी झालेल्या सोलापूर दौऱ्यावेळी मास्कची सक्ती केली आहे. पोलीस प्रशासन विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत थेट पोलीस ठण्यात आणत आहेत.