सोलापूर - खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येत नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी जिल्हा बॅंकेला सूचना कराव्यात, अशी मागणी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
खरीप हंगामपूर्व बैठक आज पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही खरीप हंगाम पूर्व बैठक घेतली. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा बॅंकेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मुद्दा मांडला. ठाकरे सरकारने केलेल्या कर्ज माफीच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे. अशा शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून काही कारणाने कर्ज पुरवठा केला जात नाही. या शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज पुरवठा करण्यासाठी शासनाने जिल्हा बॅंकेला आदेश द्यावेत, अशी सूचना पालकमंत्री भरणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना राष्ट्रीयकृत बॅंका तसेच खासगी बॅंकादेखील चालढकल करत असल्यामुळे या बॅंकांनादेखील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी आदेश द्यावेत, असे भरणे यांनी या बैठकीत मत मांडले.
शासनाची मागेल त्याला शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण तसेच ठिबक सिंचन या योजनेतील अनेक प्रस्ताव हे शासनाकडे पडून आहेत. ज्या शेतकऱ्यांना या योजना मंजूर झालेल्या आहेत. त्यांना अजून निधी मिळालेला नाही. सरकारकडे हा निधी प्रलंबित आहे. सरकारने हा निधी सोलापूर जिल्ह्याला तत्काळ द्यावा, अशी विनंतीही पालकमंत्र्यांनी या बैठकीमध्ये केली. तसेच सोलापूर जिल्ह्यातील कृषी पंप जोडण्या देखील प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 13 हजार 261 कृषी पंप जोडणी प्रलंबित आहेत, तो विषय तत्काळ मार्गी लावावा, अशी विनंतीही या बैठकीमध्ये करण्यात आली.
खरीप हंगामासाठी बी-बियाणे तसेच खताचा मुबलक साठा असून खताची कुठेही कमतरता पडणार नाही. राज्यात 50 हजार मेट्रीक टन युरियाचा बफर स्टॉक करण्यात आला असल्यामुळे युरिया खताची देखील कमतरता भासणार नसल्याचे कृषी मंत्र्यांनी या बैठकीत सांगितले, असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
पालकमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना बांधावर खते आणि बियाणे देण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार 7471 शेतकऱ्यांना आतापर्यंत बांधावर 22,170 क्विंटल खताचे आणि 171 क्विंटल बियाणे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे आदी उपस्थित होते.
दृष्टीक्षेपात खरीप हंगाम -
सोलापूर जिल्ह्यात 2.73 लाख हेकटर खरीप पेरणी नियोजन
प्रामुख्याने बाजरी, मका, तूर, उडिद, सोयाबीन, मूग, सूर्यफुल पिके.
कृषि सेवा केंद्र 8485.
खासगी कंपन्या व महाबीजमार्फत 31998 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होणार .
रासायनिक खते 2,11,390 मे. टनपैकी 43059 मे. टन पुरवठा झाला
पीक कर्ज वाटप 1438.41 कोटीचे उद्दिष्ठ आहे आतापर्यंत 116.10 कोटी रुपये वाटप
कृषी विजपंप जोडणीसाठी 13261 उद्दिष्ठ, 3280 कोटी निधी प्रस्तावित.
मागेल त्यास शेततळेसाठी 15 कोटी/निधी शेततळे अस्तरीकरणासाठी 4.32 कोटी रुपयांचा निधी
ठिबक सिंचनासाठी मागील वर्षाची प्रलंबित देणे साठी 30 कोटीची रुपयांची मागणी