सोलापूर- बनावट सह्या व बिले सादर करून कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराने सोलापूर महानगरपालिकेत 58 लाख 26 हजार रुपयांचा कचरा घोटाळा केला आहे. याबाबत मनपा अधिकारी विजय कांबळे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रवींद्र मेघराज राठोड (वय 45 रा,ठाणे) असे ठेकेदाराचे नाव आहे.
रवींद्र राठोड याची समीक्षा कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. सदर कंपनीला 8 जून 2012 रोजी सोलापूर शहरातील कचरा संकलन करणे, कचरा वाहतूक करणे बाबत वर्क ऑर्डर दिली होती. सदर मक्ता हा 10 वर्षाकरिता होता. त्यानुसार मक्तेदारास रक्कम निश्चित करण्यात आली होती. हा मक्ता देताना मक्तेदारास कचरा उचलण्याच्या शर्ती व नियम देखील लेखी दिले होते. या शर्तीत व नियमांत दिलेल्या माहितीनुसार , दिलेल्या कालावधीत प्रति मेट्रिक टन कचरा उचलणे बंधनकारक होते. जर दिलेले उद्दिष्ट साध्य न झाल्यास प्रति दिवस दंड आकारला जाईल, अशी माहिती देखील नोटीसीत दिली होती.
पंरतू मक्तेदाराने दिलेल्या अटींचा व शर्थीचा भंग केला. त्यामुळे तत्कालीन आयुक्त यांनी 27 ऑगस्ट 2015 रोजी समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीचा मक्ता रद्द केला होता. तसेच 29 ऑगस्ट 2012 ते 31 डिसेंबर 2014 या कालावधीत कचरा वाहतूक करताना दिलेल्या नियमांचे व अटींचे भंग केल्याचा दंड केला होता. आयुक्तांच्या या निर्णयाला सदर मक्तेदाराने वरीष्ठ स्तरावर अपील केले होते. या अपिलावर शासनाने चौकशी समिती नेमली होती. सदर चौकशी समितीने आपला अहवाल सादर करत आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाविरोधात काहीही हरकत नसल्याचा अहवाल दिला होता. त्यानुसार सदर मक्तेदारास प्रलंबित असलेली बिले किंवा देयके सोलापूर महानगरपालिकेत जमा करण्याच्या सूचना वेळोवेळी देण्यात आल्या होत्या.
तसेच या चौकशी अहवालात गंभीर माहिती समोर आली होती. त्यामध्ये 13 देयकांची रक्कम निश्चित करण्यात आली होती. तसेच बिलांबाबत हरकत घेण्यात आली. मक्तेदाराने केलेल्या वजनाच्या पावत्यामध्ये त्रुटी आढळून आल्या. मक्तेदारास दिलेल्या अग्रीम रकमेची नोंद न होणे, मनपा रजिस्टरवर सेवकांच्या सह्या नसणे, अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या. या सर्व बाबींचा अभ्यास करून सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांनी 22 जून 2020 रोजी आदेश पारित केला.
मक्तेदाराने ऑक्टोबर 2013 ते डिसेंबर 2014 प्रलंबित देयके किंवा दंडाची रक्कम महानगरपालिकेत जमा करावी. पंरतू लेखा परीक्षक यांनी केलेल्या चौकशीमध्ये असे निदर्शनास आले की, रवींद्र राठोड(समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनी) याने बनावट सह्या करून बिलांमध्ये हेरफार करून शासनाकडून 58 लाख 26 हजार 38 रुपये एवढी रक्कम घेतली आहे. खोटी बिले सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहेत.