सोलापूर - आशिया खंडातील सर्वात मोठी कामगार वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विडी घरकुलमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. अनेकवेळा शासन दरबारी निवेदने आणि आंदोलन करण्यात आली. मात्र, आजतागायत याची दखल घेतली गेली नाही. या विडी घरकुल वसाहतीत जवळपास 10 हजार नागरिक वास्तव्य करतात. या दहा हजार कुटुंबांना घेऊन दिल्ली आंदोलनाच्या धर्तीवर आंदोलन करणार असल्याची माहिती माजी आमदार व कामगार नेते नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दहा हजार टपाल मुख्यमंत्र्यांना पाठवणार -
सोलापूर शहराला लागून विडी घरकुल वसाहतीची स्थापना करण्यात आली. यामध्ये विडी कामगार वास्तव्यास आहेत. मात्र, हा भाग ग्रामीण भागात असल्याने सोलापूर महानगरपालिकेची सुविधा येथील नागरिक प्राप्त होत नाही. जवळ असलेल्या ग्रामपंचायतीने देखील या वसाहतीला ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करून घेतले नाही. येथील जनता अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. ड्रेनेज, पाईपलाईन, पाण्याची व्यवस्था, घन कचरा व्यवस्थापन हे सर्व काम पार पाडण्यासाठी शहर प्रशासन पुढे येत नाही किंवा ग्राम पंचायत पूढे येत नाही. या मूलभूत सुविधांसाठी दहा हजार टपाल मुख्यमंत्र्यांना पाठवून मदत मागणार असल्याची माहिती माकप नेते नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मूलभूत सुविधांसाठी दहा हजार महिलांना सोबत घेऊन बेमुदत आंदोलनाला बसणार -
विडी घरकुल वसाहतीमध्ये दहा हजार कुटुंब राहतात. प्रत्येक घरातील एक महिला असे 10 हजार महिलांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार असल्याची माकप नेते आडम मास्तर यांनी जाहीर केले. या वसाहतीत कष्टकरी महिलांना कोणत्याही प्रकारची शासन सेवा मिळत नाही. प्रत्येक वेळी आंदोलन निवेदन देऊन मागणी करावी लागते. भविष्यात रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, पाणी पूरवठा शासनाकडून न मिळाल्यास दिल्लीच्या आंदोलनाच्या धर्तीवर मोठे जनआंदोलन उभारणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.