सोलापूर - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केला. कर्ज फेडण्यासाठी आणि शेतात विहीर खोदण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. या त्रासाला कंटाळून पत्नी जयश्री संतोष सुतारने 2016मध्ये विष पिऊन स्वतःची जीवन यात्रा संपवली. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जगताप यांनी आरोपी पती संतोष उत्तरेश्वर सुतार (वय 38 वर्ष, रा. हिरज, ता. उत्तर सोलापूर, सोलापूर) याला पाच वर्षे सक्तमजुरीची आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
जयश्री हीचा विवाह 2004 साली संतोष सुतार यासोबत झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर संतोष सुतार याच्या भावाचे लग्न झाले. त्या लग्नात संतोषच्या डोक्यावर कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी संतोष हा पत्नी जयश्रीला सतत त्रास देत होता. तसेच ती आजारी असताना देखील तिला सतत शारीरिक व मानसिक त्रास देत होता. शेतात विहीर खोदण्यासाठी संतोषने माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा जयश्रीच्या मागे लावला होता. जयश्रीने माहेरी पैशांची मागणी न करता 16 एप्रिल 2016ला आत्महत्या केली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आजारी असतानाही केला गेला शारीरीक छळ -
जयश्री सुतार हिच्या पायाला जखम झाली होती. त्यावर उपचार न करता, तिला पती संतोष सुतार हा शेतात कामावर पाठवत होता. ही जखम मोठी होत गेली. शेवटी माहेरच्या लोकांनी जयश्रीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी जयश्रीच्या पायाला प्लास्टर लावले . तरी देखील संतोषने जयश्रीचा शारीरीक छळ केला. शेवटी या सर्व त्रासाला कंटाळून जयश्रीने आत्महत्या केली.
आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरी -
तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या सुनावणी वेळी चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये मुख्य साक्षीदार म्हणून मृत जयश्रीच्या वडिलांची व भावाची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारने सादर केलेला युक्तिवाद, परिस्थिती जन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपी संतोष सुतार विरोधात पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध झाला. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी संतोष सुतार याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंड देखील ठोठावला आहे. दरम्यान, सासू व सासऱ्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकार तर्फे अॅड प्रेमलता व्यास व आरोपी तर्फे अॅड यु. बी. भोजने यांनी काम पाहिले.