सोलापूर- हैद्राबाद महामार्गावर असलेल्या बोरामणी गावाजवळ 19 डिसेंबरला एक दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी महामार्गावरून जाणाऱ्या कांद्याच्या ट्रकला अडवून 475 कांद्याच्या पोत्यासह ट्रक पळवून नेला होता. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक करत त्यांच्याकडून 43 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
25 टन कांदा घेऊन श्रीरामपूरहून विशाखा पट्टणमला जात होता ट्रक-
ट्रक चालक तय्यब लतीफ फुलारी(वय 27 वर्ष रा,उमापूर,जी बसवकल्याण कर्नाटक) हे ट्रकमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सुमारे 25 टन कांदा विक्रीसाठी विशाखापट्टणमला जात होते. 19 डिसेंबरला रात्री पावणे अकराच्या सुमारास पाच संशयित आरोपींनी इनोव्हा कारने(क्र एमएच 13 सीडी 3699) पाठलाग करत बोरामनी गावाजवळ तो ट्रक अडवला. त्यानंतर ट्रक चालकाला मारहाण करून त्यांनी कांद्याने भरलेला ट्रक पळवून नेला. त्यानंतर चालक फुलारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चार दिवसांत लावला छडा-
ट्रक अडवून कांदा लुटल्या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेतला आणि तपासाची चक्रे फिरवली. पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळवून प्रथम इनोव्हा कारचा शोध घेतला. त्यानंतर रविवार पेठ व रामवाडी येथील संशयित आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला. यामध्ये कपिल राजू जाधव(वय 32 वर्ष,रामवाडी,सोलापूर), चंद्रकांत राजू जाधव (वय 27 वर्ष,न्यू धोंडिबा वस्ती,रामवाडी,सोलापूर), नृसिंह उर्फ रॉक राजू सुब्बाराव (वय 31 वर्ष,रा ,रामवाडी,सोलापूर), एजाज मकबूल खेड(वय 20 वर्ष,रा,चिराग अली तकीया,रविवार पेठ,सोलापूर), सद्दाम गफूर बागवान(वय 27 वर्ष,रा,मित्र नगर,शेळगी,सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
सोलापूर मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना विकला कांदा -
संशयित आरोपींनी ट्रकमधील 25 टन कांदा सोलापूर मार्केट यार्डातील तीन व्यापाऱ्यांना विक्री केला होता. पोलिसांनी तपास लावत, त्या तिन्ही व्यापाऱ्यांकडून 25 टन कांदा जप्त केला आहे. तसेच आरोपींकडून चोरी केलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे.