सोलापूर - शहरात खासगी अवैध सावकारी जोरात सुरू आहे. अनेक गोरगरिब लोकांच्या नाईलाजाचा फायदा घेत त्यांना अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज देत मालमत्ता ताब्यात घेऊन ठार मारण्याची धमकीही दिली जात आहे. सोलापूर शहरात अशा तीन सावकारांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अमोल जगतापच्या आत्महत्येनंतर खासगी सावकारांवर कडक कारवाई केली जात आहे. शहर पोलीस आयुक्तांनी आवाहन केले असून, नागरिकांनी पुढे येऊन खासगी सावकाराविरोधात फिर्याद देण्यास सांगितले आहे. आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळलेले पीडित विविध पोलीस ठाण्यात फिर्याद देत आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तीन सावकाराविरोधात पीडित व्यक्तीने फिर्याद दिली आहे. सचिन गायकवाड (रा.मेहता टॉवर, बुधवार पेठ, सोलापूर), गुड्डू तळभंडारे (रा.हनुमान नगर बस डेपो जवळ,भवानी पेठ,सोलापूर) , राजू कापसे (रा.प्रभाकर वस्ती,सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तीन खासगी सावकारांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी किशोर देविदास जाधव (वय-३४, रा.प्लॉट नंबर २५ गणेश नगर,मडकी वस्ती, सोलापूर) यांनी सचिन गायकवाड याच्याकडून ८० हजार रुपये व्याजाने घेतले होते आणि ८० हजार रुपयेच्या प्रतिदिनप्रमाणे आठशे रुपये रोखीने व्याज देणे असे ठरले होते. त्यानंतर फिर्यादीने दोन टप्प्यात ऑक्टोबर २०१९ ते १ जानेवारी २०२० यादरम्यान 2 लाख २२ हजार रुपये व 1 लाख ४२ हजार रुपये रोख स्वरूपात असे एकूण 3 लाख ६४ हजार रुपये खासगी सावकार सचिन गायकवाड याला परत दिले. मात्र, गायकवाड याने फिर्यादी जाधव याला आणखी ४० हजार रुपये येणे आहेत, ते मला परत दे. अथवा तुझी कॅन्टीन माझ्या नावावर करून दे, असे सांगत दमदाटी केली.
खासगी सावकार गुड्डू तळभंडारे याच्याकडून नोव्हेंबर २०१९ मध्ये जाधव यांनी वीस हजार रुपये घेतले होते. दर आठवड्याला ४ हजार रुपये व्याज देण्याचे ठरले होते. मात्र, तळभंडारे यास जाधव यांनी चार महिने आठवड्याला ४ हजार रुपये प्रमाणे ६४ हजार रुपये व्याज दिले. तरीही तळभंडारे हा जाधवकडे आणखी २६ हजार रुपयांची मागणी करून ठार मारण्याची धमकी देत होता. फिर्यादी जाधव हे त्यांच्या कॅन्टीनचे सामान आणण्यासाठी कुंभार वेस येथे गेले असता तळभंडारे व राजू कापसे यांनी कुंभार वेस येथून फिर्यादी जाधव यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय, बळजबरीने जाधव यांच्या शर्टाच्या गच्चीला धरून आणि मोटारसायकलवर बसवून पैसे वसुली करता घेऊन गेले, असे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद झाले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार हे करत आहेत.
खासगी सावकार छोठ्या-मोठ्या उद्योजकांना व्याजाने रोख रकमा देतात. त्यांकडून अधिक व्याज घेतात व मुद्दल पेक्षा ज्यादा व्याजच वसूल करतात. मानसिक त्रास देत जगणे अवघड करतात. म्हणूनच अमोल जगताप या ऑर्केस्ट्रा बार चालकाने आपल्या कुटुंबाला संपवून स्वतः देखील आत्महत्या केली. सोलापूर शहरातील सावकरी करणारे मुळा पासून संपले पाहिजे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.