सोलापूर - महावितरण मध्ये ( Solapur Mahavitran ) तंत्रज्ञ या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा गणेश विसर्जना ( Ganpati visarjan 2022 ) दरम्यान विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. विजय भीमाशंकर पनशेट्टी वय 32 वर्ष, राहणार हतुरे वस्ती,सोलापूर असे मृताचे नाव आहे. या घटनेने हतुरे वस्ती परिसरात व सोलापूर शहरात ( solapur city ) शोककळा पसरली आहे. विजय पनशेट्टीला चार वर्षाचा मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी विजयच्या पत्नीने देखील राहत्या घरी आत्महत्या केली होती. पत्नीच्या मृत्यू नंतर विजय आपल्या आई वडिलांसोबत चार वर्षीय मुलाचा सांभाळ करत होता. महावितरण ड्युटी करून मुलाचा सांभाळ करत असल्याचे पाहून आजूबाजूला राहणारे शेजारी विजयचं कौतुक करत होते. पण आता विजय पनशेट्टी गेल्याने चार वर्षीय मुलाचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न पडला आहे.
पोलिसांच्या मदतीने मृतदेह शोध : सोलापूर शहरातील हतुरे वस्ती येथे विश्वविनायक हरी ओम गणेश मंडळ स्थापन केले होते. दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे निर्बंध असल्याने गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती.यावर्षी सरकारने सर्व निर्बंध शिथिल केल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. महावितरणमध्ये काम करणारा विजय पनशेट्टी हा या गणेश मंडळाचा अध्यक्ष होता. 9 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास टिकेकरवाडी येथील एका विहिरीत विजय आपल्या मंडळासोबत मिरवणूक काढत गणेश विसर्जनासाठी गेला होता. गणेश मूर्ती घेऊन विहिरीत गेला आणि मूर्तीसोबत विजय देखील बुडाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला पण विजय पनशेट्टी सापडला नाही.पहाटेच्या सुमारास जीवरक्षक व पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले.
चार वर्षीय मुलगा पोरका झाल्याने हळहळ - विजय पनशेट्टी हा महावितरण मध्ये गेल्या दहा वर्षांपासून तंत्रज्ञ म्हणून नोकरीस होता. सोलापूर शहरातील गुरुनानक चौक येथील कार्यालयात त्याची नियुक्ती होती. त्याने पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, आई वडील असा त्याचा परिवार होता. कौटुंबिक वादातून पत्नीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. तेव्हापासून विजय मानसिक तणावात होता,पण चार वर्षीय मुलाने विजयचे सर्व मानसिक ताण हलके केले होते. गेल्या दोन वर्षांपासून विजय आई वडील व मुलगा हतुरे वस्ती येथे राहत होते. ड्युटी करून मुलाचा सांभाळ करण्यात तो नेहमी व्यस्त असायचा. पण गणेश विसर्जनादरम्यान विजयचा मृत्यू झाल्याने चार वर्षीय मुलगा पोरका झाला. आता या मुलाचा सांभाळ कसा आणि कोण करणार असा प्रश्न पडला आहे. त्याचा मृतदेह घरी आल्यावर हतुरे वस्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. चार वर्षीय मुलाला पाहून सर्व नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.