सोलापूर- महानगरपालिका हद्दीतील देगाव येथील नाल्यात मगर आढळून आली आहे. शहरातील सांडपाण्याच्या नाल्यात मगरीचा मूक्त संचार होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
देगाव परिसरातील नाल्यात मगर दिसत असल्याची चर्चा मागील काही दिवसापासून सुरू होती. नाल्याच्या परिसरात जनावरांना चारायला घेऊन गेलेल्या काही लोकांना नाल्यात मगर फिरत असल्याचे पाहिले होते. मात्र त्यांच्या सांगण्याकडे जास्त कोणी लक्ष दिले नाही. नाल्यात मगर कोठुन येणार अशी त्यावेळी चर्चा केली जात होती. मात्र ज्यांनी ज्यांनी भली मोठी मगर पाहिली होती त्यांनी मगरीची चांगलीच धास्ती घेतली होती. मगर असेल तर पाहू या असे म्हणत मागील आठ दिवसासापून या नाल्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. त्यानंतर या नाल्यात भली मोठी मगर असल्याचे समोर आले आहे.
नाल्यात फिरणाऱ्या मोठ्या मगरीचा शोध घेण्यासाठी पालिका प्रशासन आणि वन विभागाने कॅमेरे लावले होते. त्या कॅमेऱ्यात ही मगर कैद झाली आहे.
एवढी मोठी मगर या नाल्याच्या पाण्यात आलीच कुठून हा मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. या नाल्यात आणखी काही मगरी असल्याची शक्यता आहे. मात्र रविवारी आढळून आलेल्या मगरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या मगरीला तात्काळ पकडून योग्य त्या ठिकाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.