सोलापूर- केंद्र सरकार विरोधात सोलापुरातील माकप व सिटूच्या वतीने सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती. याला काँग्रेसने देखील पाठिंबा दिला होता. मात्र पोलिसांनी कोरोना नियमावलीवर बोट ठेवत यांच्या कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे हे आंदोलन होणार की नाही याबाबत साशंकता होती. परंतु सोमवारी माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर एमआयडीसी भागात कारखाने बंद करून आंदोलन करण्यात आले. यावेळी माकप आणि सिटूचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या प्रकारानंतर एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ आंदोलन स्थळी दाखल होत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल केला आहे.
![केंद्र सरकार विरोधातील माकपचे गनिमी कावा आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-01-cpi-m-guerrilla-movement-against-the-central-government-was-suppressed-by-the-police-10032_27092021120942_2709f_1632724782_870.jpg)
देशभरातील सर्व शेतकरी संघटना व डाव्या आघाडीचा बंद-
देशभरातील सर्व शेतकरी संघटना आणि डाव्या आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. त्यानुसार या बंदला सोलापुरातुन भाजप वगळता सर्व पक्षांनी आणि संघटनांनी पाठिंबा दिला होता. सोलापुरातील सर्व व्यापारी दुकानदारांनी एक दिवसाचा बंद पाळण्याचे आवाहन माकप आणि डाव्या आघाडीकडून करण्यात आले होते. तसेच मार्केट यार्ड देखील बंद करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले होते, मात्र पोलिसांनी अशा प्रकारचा कोणताही बंद करण्यास परवानगी नाकारली होती.
विविध मागण्यांसाठी बंद-
शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करावे, कामगारांविरोधात मंजूर केलेले काळे कायदे रद्द करावे. देशात तरुणांना बेरोजगार करणारे चुकीचे धोरण व कायदे लागू करू नये. इंधनाचे दर नियंत्रणात ठेवावेत. खाद्य तेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमंती तत्काळ कमी कराव्यात, अशा विविध मागण्यांसाठी आज भारत बंद पुकारण्यात आला आहे. सोलापुरातून डाव्या आघाडीच्या नेत्यांनी याला मोठा प्रतिसाद दिला आहे.
बंदला संमिश्र प्रतिसाद-
भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देत सोलापुरातील डाव्या आघाडीच्या नेत्यांनी पुकारलेल्या सोलापूर बंदला संमीश्र प्रतिसाद मिळाला आहे. कारण सोलापुर शहरातील सर्व दुकाने,शहरातील बाजारपेठ चालूच होती. ऑटो रिक्षा इतर प्रवासी वाहने रस्त्यावर धावत होती. पोलिसांचा शहरातील चौकाचौकांत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा - संयुक्त किसान मोर्चाकडून आज 'भारत बंद', दिल्ली-गुरुग्राम बॉर्डरवर सुरक्षा यंत्रणा तैनात
हेही वाचा - जळगावात 'भारत बंद' संमिश्र प्रतिसाद; काँग्रेस-राष्ट्रवादीने सक्तीने केली दुकाने बंद