सोलापूर - शहरातील एका कोविडं रुग्णालयातून पळून जात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास मोठ्या शिताफीने पकडण्यात आरोग्य खात्याला यश आले आहे. धक्कादायक म्हणजे या रुग्णांने सोलापूर ते मंद्रुप असा 20 किमीचा हा मार्ग पायी पार केला होता. हा रुग्ण मानसिक रोगी देखील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. लघुशंकेचे निमित्त करून त्याने पलायन केले होते.
हेही वाचा - लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; जालना जिल्ह्यावर शोककळा
सोलापूर शहरातून आपल्या गावाकडे हा रुग्ण जात होता. जाताना त्याला थकवा जास्त जाणवत असल्याने मंद्रुप गावाच्या पुढे त्याला जाता आले नाही. शेवटी त्याला रुग्णवाहिकेने पुन्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा रुग्ण भंडारकवठे (दक्षिण सोलापूर) येथील रहिवासी आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सोलापूर येथील एका कोविड रुग्णालयात त्यावर उपचार सुरू होते.
बुधवारी त्याने रुग्णालय प्रशासनाला हुलकावणी देत, तेथून पोबारा केला होता. आपल्या गावी जाण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. मात्र, तो मंद्रुप (तेरा मैल) पर्यंतच जाऊ शकला. त्यापुढील अंतर त्याला कापता आले नाही.
अशक्तपणा आणि धाप लागल्यामुळे तो मंद्रुप येथील रस्त्यावरच बसला. त्रास सहन न झाल्याने मुख्य रस्त्यावर लोळू लागला. नागरिकांना संशय होताच त्यांनी त्यापासून अंतर ठेवत त्याची विचारपूस केली. त्यानंतर गावातील नागरिकांनी तलाठी यांना माहिती दिली. त्यांनी ताबडतोब रुग्णवाहिकेशी संपर्क करून आरोग्य खात्याचे कर्मचारी बोलावले. काही वेळाने रुग्णवाहिका व इतर कर्मचारी दाखल झाले. पीपीई किट परिधान करून त्याला उपचारासाठी परत रुग्णालयात घेऊन गेले. कोरोना रुग्ण गावात आल्याची माहिती मिळताच गावात एकच धावपळ पाहायला मिळाली. त्याला लांबूनच नाव, पत्ता विचारत होते. लांबूनच त्याला पाण्याची बाटली देण्यात आली. त्यानंतर तीन तासांच्या अथक प्रयत्नाने आरोग्य कर्मचारी यांनी त्या रुग्णास गावातून घेऊन गेले.