सोलापूर - निर्जनस्थळ व अंधाराचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या अबुल हसन सलीम इराणी (वय 31) यास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याने केलेल्या सहा गुन्ह्यांची उकल तपासादरम्यान झाली असून सोन्याच्या दागिन्यांसह मोबाइल असा सुमारे 2 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील दागिने विकत घेणारा सांगोला येथील सराफ देवेंद्र बुचडे यास ताब्यात घेतले आहे.
महिलांच्या गळ्यातील दागिने चोरल्याच्या काही घटना शहरात समोर आल्या होत्या. त्याचा तपास गुन्हे शाखेचे पथक करत होते. यातच अक्कलकोट नाका ते यल्लालिंग नगरच्या दरम्यान 3 नोव्हेंबर रोजी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी 1 लाख 5 हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या गुन्ह्याचा तपास करत असताना अन्य गुन्ह्यांचा शोध लागला आहे. अबुल हसन ईराणी देगाव रोड मार्गे सोलापूर शहरात चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशीत आणखी खुलासा झाला आहे. विजापूर नाका हद्दीतील जुना विजापूर नाका, इंदिरानगर, संतोष नगर, नंडगिरी पेट्रोल पंप व विवेकानंदनगर अशा ठिकाणी दागिने चोरल्याची कबुली या चोरट्याने दिलीय. तसेच सिव्हिल चौकातून लहान मुलांच्या हातातील मोबाइल हिसका मारून पळवल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील 74 ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन मोबाइल आरोपीकडून हस्तगत केले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त बापू बांगर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडेकर, पोलीस हवालदार अशोक लोखंडे, इमाम इनामदार आणि अन्य कार्मचाऱ्यांनी केली.