सोलापूर- कोव्हिड -19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने रुग्णासह सर्व कुटुंबाला सिंहगड येथील महाविद्यालयात क्वारंटाईन केले होते. याचाच फायदा उचलून चोरट्याने क्वारंटाईन सेंटरमध्ये गेलेल्या कुटुंबीयांच्या घरातील सोन्या चांदीचा ऐवजावर डल्ला मारला आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात 4 लाख 50 हजार रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज चोरी झाल्याची नोंद झाली आहे. शिवाजी शहाजी भोसले(वय 35 रा,समर्थ सोसायटी, विजापूर रोड) असे तक्रारदाराचे नाव आहे.
तक्रारदार शिवाजी भोसले यांच्या वडिलांची कोव्हिड टेस्ट पॉजिटिव्ह आल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांनतर प्रशासकीय वैदकीय अधिकाऱ्यांनी सर्व कुटुंबाची तपासणी केली असता, त्यांना देखील कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना 4 सप्टेंबर 2020 रोजी क्वारंटाईन केले होते. त्यामुळं त्यांनी घराला कुलप लावून पुणे रोड येथील सिंहगड कॉलेज मध्ये गेले होते. 11 सप्टेंबरला भोसले कुटुंबीय क्वारंटाईन सेंटर मधून डिस्चार्ज मिळाल्याने घरी परत आले. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या चोरीच्या घटनेत भोसले यांच्या घरातील कपाटामधील 4 लाख 50 हजार रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला होता. यामध्ये बारा तोळे सोने व दीड किलो चांदी असा मुद्देमालाचा समावेश आहे. त्यानंतर भोसले यांनी तत्काळ या चोरीची माहिती विजापूर रोड पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. श्वान पथक बोलावून तपासणी केली असता, श्वान पथक काही अंतरावर जाऊन घुटमळत राहिले. बोटांचे ठसे घेणारे पथक दाखल होऊन सर्व वस्तूंवरील ठसे घेतले आहेत. विजापूर नाका पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे याचा अधिक तपास करत आहेत.