सोलापूर - पत्नीला नांदविण्यास पाठवीत नसलेल्या सासऱ्याच्या दारात जावयाने काल मंगळवारी मध्यरात्री धिंगाणा घालत, तमाशा केला. मेव्हणा, मेव्हणी व पत्नी यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा खुनी हल्ला करणाऱ्या जावयाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजेश किसन सावंत यांची मुलगी दिव्या हिचा उस्मानाबाद जिल्ह्यातील माकडाची उपळाई येथील योगेश महादेव घोगरे याच्यासोबत २०१७मध्ये विवाह झाला होता. दिव्या ही सोलापुरात शिक्षण घेत असल्याने माहेरी राहण्यास गेली होती. परंतु सुट्टीच्या दिवशी ती सासरी जात असे. पती योगेश हा तिच्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करीत होता. यंदाच्या दिवाळी सणानंतर मुलीला सासरी पाठवून देणार असल्याचे सावंत यांनी सांगितले होते.
हेही वाचा - ...तरच घोषणा करा; वीजबिलप्रश्नी फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
पेट्रोल ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न-
मात्र 17 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हातात पेट्रोलचा भरलेला कॅन व दोन काडेपेटी घेऊन जावई सासुरवाडी गेला. पत्नी दिव्या हिला सासरी का पाठवले नाही, असा जाब विचारत योगेश सासुरवाडीतील लोकांना शिवीगाळ केली. त्यावेळी समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेहुण्याचा गळा जावयाने दाबला. या प्रसंगातून राजेश यांनी मुलाची सुटका केली. त्यानंतर त्याने सासऱ्यांना मारहाण केली. आत्ताच्या आत्ता सोडचिठ्ठी द्या, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकीही त्याने दिली. त्यादरम्यान पेट्रोलच्या डब्याचे झाकण काढून योगेश याने सासरा राजेश यांच्या दोन मुली व मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु इतरांनी त्यांच्या हातातील पेट्रोलचा कॅन आणि काडीपेट्या काढून घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा - अजित पवारांच्या 'या' वक्तव्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला निषेध
भा.द. वि.307 नुसार गुन्हा दाखल -
याबाबत राजेश सावंत यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी लागलीच जावई योगेश यास ताब्यात घेतले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे योगेश घोगरे विरुद्ध खुनी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.