सोलापूर - विद्युत ठेकेदाराचा परवाना देण्यासाठी मागणी केलेल्या रकमेपैकी 15 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सहायक विद्युत निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( Anti Corruption Bureau ) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई अंत्रोळीकर नगरातील विद्युत निरीक्षक कार्यालयात झाली आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजुलअल्ली मेहबूब मुल्ला (वय 53 वर्षे), असे अटक करण्यात आलेल्या सहायक विद्युत निरीक्षकाचे नाव आहे. विशेष म्हणजे लाच घेण्यासाठी सहायक विद्युत निरीक्षक कोल्हापूरहून सोलापुरात आला.
विद्युत निरीक्षक कार्यालयात इलेक्ट्रिकलची कामे घेण्यासाठी नवीन फॉर्म देण्याचे काम सुरू होते. तक्रारदाराने आवश्यक असणारा विद्युत पर्यवेक्षक परवाना तसेच विद्युत ठेकेदार परवाना मिळवण्यासाठी विद्युत निरीक्षक विभाग, सोलापूर येथे अर्ज केला होता. तक्रारदाराला विद्युत पर्यवेक्षक परवाना मिळाला आहे. ठेकेदार परवाना मिळवण्यासाठी तक्रारदार हेलपाटे मारत होता. संशयीत आरोपी फैजअली मुल्ला याकडे सोलापूर आणि कोल्हापूर, असे दोन जिल्ह्यांचा कार्यभार आहे. ठेकेदाराचा परवाना घेऊन सहायक विद्युत निरीक्षक लाच घेण्यासाठी कोल्हापुरातून सोलापुरात आला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.
बक्षिस म्हणून मागितली होती लाच - तक्रारदार विद्युत ठेकेदार परवाना मिळवण्यासाठी पाठपुरावा करीत होता. तेव्हा तक्रारदाराला यापूर्वी दिलेल्या विद्युत पर्यवेक्षक परवान्याचे बक्षीस म्हणून 10 हजार रुपये व सध्याच्या परवान्याचे 22 हजार, अशी एकूण 32 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयात सापळा रचून 32 हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून 15 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
हेही वाचा - Raju Shetty Criticism on Sharad Pawar : शेतकऱ्यांनी शेती करावी की कारखाना ताब्यात घ्यावा - राजू शेट्टी