सोलापूर - खाली झोली ! खाली थाली ! कैसे मनेगी हामारी दिवाली ! ही वास्तविक दाहकता आहे गरीब कष्टकाऱ्यांची. कोरोनाच्या प्रादुर्भावाने अर्थचक्र मंदावले, टाळेबंदीने हातातले काम हिरावून घेतले आहे. सरकारला रोजीरोटीबाबत विचारले असता, रिकाम्या पोटी आत्मनिर्भर होण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यामुळे गोरगरीब कष्टकाऱ्यांना माती खाण्याची वेळ आली असल्याचा आरोप करत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केला आहे. तसेच कष्टकऱ्यांच्या या परिस्थितीला जबाबदार धरत या महिला संघटनेने केंद्र सरकारचा निषेध करत मातीचे लाडू करून काळी दिवाळी साजरी केली आहे.
![मातीचे लाडू वाटून सरकारचा केला निषेध](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-03-akhil-bharatiya-janwadi-mahila-sanghatana-celebrated-diwali-with-a-clay-laddu-10032_13112020194455_1311f_1605276895_2.jpg)
अखिल भारतीय महिला संघटनेच्या वतीने शुक्रवारी काळी दिवाळी साजरी करत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी राज्याध्यक्षा माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी सरकारवर टीकेची झोडही उठवली. सरकारच्या कामगार- कर्मचारी विरोधी धोरणांमुळे दिवाळी कशी साजरी करायची असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ आली असल्याचा आरोप केला आहे.
आता माती खाण्याशिवाय पर्याय नाही-
सरकारला बुडवणाऱ्या धनदांडग्यांच्या आणि भांडवलदाराची खरी दिवाळी साजरा होईल, पण सरकारला कर अदा करणाऱ्या सर्वसामान्य गरिबांची दिवाळी होणार का? असा सवालही या आंदोलक महिलांनी सरकारला केला आहे. ऐन सणासुदीला कामगारांना बोनस नाही, हक्करजा नाही, विडी कामगारांना मदत म्हणून दिलेली रक्कम बळजबरीने कपात केली. आता माती खाण्याशिवाय पर्याय नाही म्हणून मातीचे प्रतिकात्मक लाडू बनवून वाटप करून सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला.
म्हणून मातीचे प्रतिकात्मक लाडू बनवून सरकार विरुध्द राज्यव्यापी निषेध करण्यात आला. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा समिती च्या वतीने नसीमा शेख व तसेच जिल्हा अध्यक्षा शेवंता देशमुख व जिल्हा सचिवा शकुंतला पाणिभाते यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या मध्यवर्ती भागात दत्त नगर, भगवान नगर, राहुल गांधी झोपडपट्टी,जंगम वस्ती, गांधी नगर,स्वागत नगर समाधान नगर सुनील नगर आदी ठिकाणी काळी दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा सुनंदा बल्ला, अंबुबाई पाथरुट, पुष्पा स्वामी, जलालबी शेख, सावित्रा गुंडला, राशिदा शेख,महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.