सोलापूर महाराष्ट्र राज्यात परतीचा पाऊस सुरू झाला आहे. परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या पावसामुळे शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. गुरुवारी रात्रभर सोलापूर जिल्ह्यातील माढा, तालुक्यातील ढवळस, करमाळा तालुक्यातील केम परिसरात ढगफुटी सदृश्य पर्जन्यवृष्टी झाली आहे. परतीच्या पावसामुळे नद्या, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. तालुक्यातील विविध ठिकाणची वाहतुक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. करमाळा तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे. केम गावात रस्त्यावर पाणीचपाणी झाले आहे.
माढा तालुक्यातील ढवळस निमगाव रस्त्यावरील वाहतूक बंद माढा तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. माढा येथील ढवळस गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. यामुळं रस्त्यांना नदीचे स्वरुप आलं आहे. ढवळस परिसरात सलग सहा तास जोरदार पाऊस झाला आहे. या जोरदार पावसामुळं निमगाव ढवळस रोडवरील पूल वाहून गेला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. सर्वत्र पाणी झाल्यानं रस्ते बंद झाले आहेत. ढवळस निमगाव रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.
करमाळा तालुक्यातील केम गावात तुफान पाऊस करमाळा तालुक्यातील केमसह आजूबाजूच्या पाथुर्डी, मलवडी, आदी गावात अतिवृष्टी झाली आहे. केम गावाचा दहा ते पंधरा गावाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळं केम गावातील जिल्हा परिषद शाळेसह हायस्कूल आणि कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. किराणा दुकानातील किराणा माल, कृषी दुकानातील खत, शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली आहेत. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तातडीनं पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांनी केली आहे.