सोलापूर - सोलापूर शहर जिल्हा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने बहुपर्यायी निवड प्रश्न परीक्षा पद्धती लागू करा ही प्रमुख मागणी घेऊन सोलापूर विद्यापीठासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी सोलापूर विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांनी स्वतः हलगीनाद, शंखनाद केला व जोरदार घोषणाबाजी केली. तब्बल दोन तास विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पोलीस प्रशासन व विद्यापीठ प्रशासनाची तारांबळ उडाली होती. कुलगुरु डॉ मृणालिनी फडणवीस ( Vice Chancellor Dr Mrinalini Fadnavis ) यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला बोलावून त्यांची बाजू ऐकून घेतली.
कुलगुरुंनी दिले आश्वासन - नेमकी परीक्षा कोणत्या पध्दतीने घ्यावी व त्याचे पुढील मार्गदर्शक सूचना, वेळापत्रक याविषयी मंत्री महोदय व परीक्षा मूल्यमापन मंडळ संचालक यांच्या सोबत यांच्याशी चर्चा झाली असून 16 जून रोजी न्यायालयाची सुनावणी आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची मागणी व परीक्षा वेळापत्रकाबाबत फेरबदल व शुद्धीपत्र कळविले जाईल, असे आश्वासन कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिल्या. यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
निवेदनातून विद्यार्थ्यांची मागणी - सोलापूर जिल्हा संघर्ष समितीच्या निवेदनात असे म्हटले की, महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठानी बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने परीक्षा घेण्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या विषयीची अद्ययावत माहिती व शासन निर्णय आदींचा आढावा घेऊन सोलापूर विद्यापीठामार्फत बहुपर्यायी प्रश्न पद्धत परीक्षा पद्धत लागू करावी. ही प्रमुख मागणी घेऊन विद्यार्थ्यांच्यामार्फत निवेदने देण्यात आलेली आहेत.
हेही वाचा - Ramdas Athavale Solapur : 'संभाजीराजेंना धोका शिवसेनेने दिला, भाजपाने नव्हे'