सोलापूर- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही एटीएम मशीनच्या स्क्रीनवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेल्या जाहिराती अजून झळकत आहेत. प्रत्येक पाच सेकंदाला मोदींचा फोटो असलेली जाहिरात ही एटीएम मशीनच्या स्क्रीनवर दिसत आहे. सोलापूर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनच्या स्क्रीनवर या सर्व जाहिराती दाखवल्या जात आहेत.
एटीएममध्ये येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे एटीएम मशीनच्या स्क्रीनवर दाखविली जाणारी जाहिरात ही लोकांवर नक्कीच प्रभाव पाडणारी ठरत असल्याने अजूनही मोदी यांचे फोटो असलेल्या जाहिराती सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून सहा दिवस उलटले असले तरीही एटीएम मशीनच्या स्क्रीनवर मोदींचे फोटो असलेल्या जाहिराती झळकतच आहेत. मोदींनी सुरू केलेल्या जनधन योजना तसेच पंतप्रधान मुद्रा बँक योजनेच्या संदर्भातील दोन जाहिराती या एटीएम मशीनच्या स्क्रीनवर दाखविल्या जात आहेत. या दोन जाहिरातीनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाची स्वतःची असलेली गो ग्रीन ही जाहिरात देखील दाखविली जात आहे. प्रत्येक दहा सेकंदानंतर मोदींचा फोटो असलेली जाहिरात एटीएम मशीनच्या स्क्रीनवर दिसत आहे.
एटीएम मशीनच्या स्क्रीनवर आतापर्यंत बँकेच्या योजना संदर्भातील जाहिराती दाखविल्या जात होत्या. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेल्या जाहिराती नंतर दाखवायला सुरुवात झाली. वास्तविक पाहता आचारसंहिता लागल्यानंतर एटीएम मशीनच्या स्क्रीनवर अशा पद्धतीने मोदींचे फोटो असलेल्या जाहिराती दाखवणे कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे?