पुणे - पुरंदर तालुक्यात बेलसर येथे 'झिका' विषाणू(zika virus)चा राज्यातील पहिला रुग्ण आढळला. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तीनसदस्यीय केंद्रीय पथक पुण्यात दाखल झाले आहे. आज आणि उद्या हे दिवसभर प्रशासनासोबत बैठका घेऊन आढावा घेणार आहे.
दोन दिवस घेणार आढावा
बेलसर येथे एका ५० वर्षीय महिलेला झिका विषाणूचे संक्रमण झाले. सध्याच्या परिस्थितीचे परीक्षण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. या पथकात दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय हिवताप संशोधन संस्थेतील कीटकतज्ज्ञ डॉ. हिंमत सिंह, नवी दिल्लीच्या लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्री रोग तज्ज्ञ प्रा. डॉ. शिल्पी नैन आणि विमानतळ आरोग्य अधिकारी प्रणील कांबळे यांचा समावेश आहे.
रक्तजल नमुने घेऊन करणार अभ्यास
बेलसर येथे एका ५० वर्षीय महिलेला झिका विषाणूचे संक्रमण झाले आहे. या महिलेला सौम्य लक्षणे असल्याने जास्त भीती नाही. नवा विषाणू असल्याने याला गांभीर्याने घेतले आहे. पहिलाच रुग्ण आढळल्याने केंद्रीय पथक पुण्यात आले आहे. हे पथक दोन दिवस माहिती तसेच चर्चा करणार आहे आणि त्यानंतर जिथे हे रुग्ण आढळून आले आहेत, त्या गावात पथक जाऊन बेलसरसह आजूबाजूच्या गावात रक्तजल नमुने घेऊन त्याचा अभ्यास करणार आहे. प्राथमिक तपासणीत जास्त भीतीचे कारण नाही, अशी माहिती यावेळी आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.