पुणे - बीबीएच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने आईचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करत तिचे आणि एका 42 वर्षीय व्यक्तीचे फोटो आणि व्हिडीओ मिळवले. ते फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आईच्या प्रियकराकडे 15 लाखाची खंडणी मागितली. खंडणीतील एक लाख रुपये स्वीकारताना पोलिसांच्या मुलगी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा प्रकार उघडकीस आणला. मिथुन मोहन गायकवाड (वय 29) आणि प्रियंका क्षीरसागर (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता आठ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी तक्रार दिली असून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या महिलेच्या मुलीला दोघांवर संशय होता. या दोघांच्या प्रेमसंबंधाचा पर्दाफाश करण्यासाठी मुलीने स्वतःच्या आईचे व्हाट्सअप हॅक केले. त्यातून तिने स्वतःची आई आणि तक्रारदार व्यक्तीचे एकत्र असलेले फोटो, व्हिडीओ मिळवले. हेच फोटो व्हिडिओ तिने आपल्या प्रियकराला दाखवले. त्यानंतर या दोघांनाही मिळून तक्रारदार व्यक्तीकडून खंडणी उकळण्याचा कट रचला.
आरोपी मिथुन गायकवाड याने तक्रारदाराला संपर्क साधून तुमचे आणि मैत्रीणीचे एकत्र असलेले फोटो व्हिडीओ कुटुंबीयांना पाठवेल आणि सोशळ मीडियावर व्हायरल करेल. हे टाळायचे असेल तर 15 लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, असे सांगितले. फिर्यादीने भीतीपोटी आणि बदनामीला घाबरून 2 लाख 60 हजार रुपये त्यांना दिले. परंतु आणखी पैशाची मागणी होत असल्याने त्यांनी पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी सापळा रचून उर्वरित पैसे घेण्यासाठी त्याला दगडूशेठ गणपती मंदिराजवळ बोलावले.
शुक्रवारी पैसे घेण्यासाठी आलेल्या मिथुन गायकवाडला 1 लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने प्रेयसीसोबत मिळून म्हणून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस कर्मचारी पांडुरंग वांजळे, मधुकर तुपसुंदर, संजय भापकर, रवींद्र फुलपगारे, प्रवीण राजपूत, अतुल साठे, अमर पवार, राजेंद्र लांडगे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली.
हेही वाचा - अनिल देशमुखांचे वकील तसेच सीबीआय अधिकाऱ्याच्या कोठडीत दोन दिवस वाढ