पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी घटना निगडी परिसरात घडली आहे. भर दिवसा देशी दारुच्या दुकानात घुसून तेथील व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवत दारुच्या बाटल्या डोक्यात फोडून गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी भरदुपारी घडली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. याप्रकरणी प्रदीप लक्ष्मणराव खिरडे (२७ रा.निगडी) यांनी तक्रार दिली आहे.
निगडी परिसरात देशी दारुचे सरकार मान्य दुकान आहे. बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ३ अज्ञात तरुण आत आले. त्यातील एकाने कोयता लपवून आणला होता. त्या पैकी एकाने आत आल्यानंतर परत बाहेर जाऊन परत आत येत थेट टीव्हीवर दगड मारला. त्यानंतर दोघांनी काउंटरवरील तक्रारदाराकडे जात एकाने प्रदीपच्या कॉलरला धरत धक्का दिला. लागलीच दुसऱ्या आरोपी हा काउंटरवर चढून कोयत्याचा धाक दाखवत होता. दुसऱ्याने तोपर्यंत प्रदीपच्याच्या कानशिलात लगावली. काउंटरवर चढून कोयता हातात घेऊन असलेल्या आरोपीने प्रदीप यांच्या डोक्यात देशी दारुच्या ७ ते ८ बाटल्या फोडल्या. यामुळे तो घाबरुन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी २ आरोपींना अटक केली असून त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे. तर एका आरोपीला बालसुधारगृहात नेण्यात आले आहे. दिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच गुन्हेगार पोलिसांना घाबरत नसल्यानेच भरदिवसा अशा जीवघेण्या घटना घडत आहेत, अशी चर्चा नागरिक करू लागले आहेत.