पुणे - 'कोरोना विषाणू'चा जगभर झालेला प्रसार, यामुळे या विषाणूपासून होणाऱ्या संसर्गावर उपचार शोधण्याचे काम जगातील सर्वच संशोधक युद्धपातळीवर करत आहेत. यामध्ये उपारासाठी अनेक पर्याय धुंडाळले जात आहेत. मात्र, सध्या जगभरात कोरोना संसर्गापासून बचाव म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन फॉस्फेट हे औषध वापरता येऊ शकते का ? या बद्दल चांगलीच चर्चा होत आहे. खरंतर हे औषध मलेरियावर उपचार म्हणून वापरले जाते. याच विषयावर डॉ. अनंत फडके यांच्यासोबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने चर्चा केली आहे.
हेही वाचा... 'अमेरिकेची मागणी पूर्ण करू; मात्र, लस तयार झाल्यावर त्यांनी भारताला प्राधान्य द्यावे'
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन फॉस्फेट हे औषध कोरोनावर उपयोगी आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. तर दुसरीकडे त्यांचेच वैद्यकीय सल्लागार मात्र याबाबत साशंक आहेत. भारतात हे औषध मोठ्या प्रमाणात तयार होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याबाबत भारताकडे मागणी देखील केली आहे.
मुळात हे औषध चीन आणि फ्रान्समध्ये झालेल्या दोन अभ्यासावरून चर्चेला आले. कोविड 19 च्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वन फॉस्फेट उपयोगी पडू शकते, असे या अभ्यासात सांगितले आहे. अर्थात हे दोन्ही अभ्यास हे लहान स्वरूपाचे म्हणजे कमी रुग्णांवर केलेले अभ्यास आहेत, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात सध्या तरी चाचणी स्वरुपात या औषधाचा मर्यादित उपयोग केला जातो आहे. त्यातून जे परिणाम समोर येतील, तसे निर्णय पुढे घेतले जातील. मात्र, सध्या हे सर्व प्राथमिक स्तरावर आहेत.
हेही वाचा... ..तर आम्ही भारताचा सूड घेऊ; ट्रम्प यांची धमकी!
काही देश या औषधांचा कोविड-19 च्या उपचारासाठी काही प्रमाणात वापर करत आहेत. अमेरिकेकडे या औषधांचा साठा नसल्याने त्यांनी भारताला हे औषध निर्यात करण्याची विनंती केली होती. अर्थात हे औषध हा उपाय असल्याचे अजून तरी पूर्णपणे समोर आलेले नाही. त्यावर मोठ्या स्वरूपात अभ्यास सुरू आहे. मात्र, त्याआधीच याची साठेबाजी होते की काय ? अशी स्थिती आहे. तसे करणे चुकीचे होईल, असे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. भारतात संधिवात असलेले रुग्ण अनेक वर्षे हे औषध घेत आहेत. त्यांना रोज या औषधाची गरज लागते. त्यामुळे कोविड-19 साठी 'हायड्रॉक्सीक्लोरोक्विन फॉस्फेट'ची चर्चा सुरू असताना याबाबीचाही विचार झाला पाहिजे, असे जाणकारांनी म्हटले आहे.