पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा प्रश्न हा सर्व सामान्य नागरिकांची डोके दुःखी बनला आहे. मात्र, एका गोष्टीमुळे हा कचरा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. शहरातील कचरा उचलण्यासाठी चक्क मुंबई पालिकेच्या गाड्या शहरात दाखल झाल्या आहेत. त्याद्वारे कचरा उचलला जात असल्याने शहरातील नागरिकांनी भुवया उंचावल्या आहेत.
शहरात गेल्या काही दिवसांपासून कचरा प्रश्न गहन होत चालला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आपापल्या पद्धतीने आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी तर थेट स्थायी समितीच्या कक्षासमोरच कचरा आणून टाकत आंदोलन केले. मात्र, आता कचरा उचलण्यासाठी मुंबई पालिकेच्या गाड्या आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्यांचे पासिंग होत नसल्याने मुंबई पालिकेच्या काही गाड्या कचरा उचलण्यासाठी आल्या आहेत. मात्र, या गाड्या मुंबई पालिकेकडून आल्या नसून संबंधित ठेकेदाराने त्या गाड्या आणल्या आहेत. मुंबई पालिकेचा कचरा उचलण्याचा ठेका असल्याने त्याने या गाड्या आणल्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे.