पुणे - देशात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. १६ जानेवारीला जेव्हा पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाले, तेव्हा पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमधून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सेवा पुरवणारे सेवक, सरकारी आणि खाजगी वैद्यकीय अधिकारी नर्सेस, वॉर्डबॉय आणि सुरक्षारक्षक यांना लस देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुणे महानगरपालिका, पोलीस दल, गृहरक्षक अधिकारी व नागरिक संरक्षण दल अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्यात आली होती आणि आता तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षावरील व्याधिग्रस्त नागरिकांना लस देण्यात येत आहे. ही मोहीम एक मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना लसीकरण करायचे असल्यास त्यांनी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. याच्या नोंदणीसाठी को-विन ॲप आणि आरोग्य सेतू ॲप वरून नोंदणी करता येते. पुणे शहरात सध्या 38 सरकारी रुग्णालयांमध्ये तर आठ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध आहे.
ही आहेत सरकारी रुग्णालये -
कमला नेहरू हॉस्पिटल मंगळवार पेठ, राजीव गांधी हॉस्पिटल येरवडा, डॉक्टर नायडू हॉस्पिटल पुणे स्टेशन, गंगाराम कर्णे दवाखाना नगर रोड, कळस दवाखाना येरवडा, मालती काची प्रसूतिगृह भवानी पेठ, बाबासाहेब आंबेडकर दवाखाना डायस प्लाट, बिंदुमाधव ठाकरे वारजे, बारटक्के दवाखाना वारजे, भानगिरे दवाखाना मोहम्मदवाडी, पोटे दवाखाना सहकार नगर, मीनाताई ठाकरे पॉलीक्लिनिक वडगाव शेरी, सावित्रीबाई फुले दवाखाना गुरुवार पेठ, चंदूमामा सोनवणे प्रसूतिगृह, कलावती मावळे दवाखाना, रमाबाई आंबेडकर दवाखाना, प्रेमचंद ओसवाल दवाखाना या 38 ठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध आहे.
ही आहेत खासगी रुग्णालये -
औंध इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स औंध, इन लेक अंड बुधराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल एरंडवणे, साई श्री हॉस्पिटल औंध, कृष्णा हॉस्पिटल कोथरुड, राव हॉस्पिटल बिबवेवाडी, शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल फुरसुंगी, गॅलक्सी केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कर्वे रोड या ठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच येत्या काळात खासगी रुग्णालयाची संख्या वाढवण्यात येणार आहे.
नागपुरातही खासगी रुग्णालयांतील प्रत्यक्ष लसीकरणाला शुक्रवारपासून होणार सुरुवात -
शहरात ज्येष्ठ नागरिकांना 1 मार्चपासून 11 शासकीय केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात वाढता शासकीय यंत्रणेवरील ताण आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी पाहता खासगी रुग्णालयांना लसीकरणाच्या मोहिमेची तयारी झाली आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरणासाठी नावनोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली आहे. शुक्रवारपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. नागपुरात 11 शासकीय केंद्रांत तीन दिवसात जवळपास 3 हजार ज्येष्ठ आणि इतर आजार असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. पण शासकीय रुग्णालयात गर्दी वाढलेली आहे. सामाजिक अंतर ठेवण्यासह अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे. यासाठी खासगी रुग्णालयांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे.
हेही वाचा - Corona Bulletin : राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा