पुणे - महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्माण झालेली परिस्थिती अभुतपूर्व आहे. सर्वोच्च न्यायालयात 'महाविकासआघाडी'च्यावतीने वकिलांनी तातडीने विश्वासदर्शक ठराव मांडण्याची मागणी केली. तर, भाजपकडून वेळ मागण्यात आला आहे. आता मंगळवारी सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे असेल, असे सांगत हा निर्णय आगामी काळात दिशादर्शक ठरेल, असे मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.
सध्या राज्यात स्थापण्यात आलेले सरकार घटनाबाह्य आहे की नाही, विश्वासदर्शक ठराव कधी घ्यावा आणि तो आवाजी मतदानाने की खुल्या पद्धतीने तसेच रेकॉर्डकरून घ्यावा, याबाबत देखील न्यायालय निर्देश देऊ शकते. त्यामुळे आगामी काळात हे पाहणे महत्वाचे ठरेल, असे बापट यांनी सांगितले. एखादे सरकार स्थापन झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव कधी घ्यावा याबाबत आपल्याकडे काही ठोस नियम नाहीत. अनेक राज्यात वेगवेगळ्या कालमर्यादा देण्यात येतात. त्यामुळे एकदा शपथविधी झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव कधी मांडला जावा याबाबतही काही निर्देश न्यायालय देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल, असे बापट म्हणाले.