पुणे - औंध परिसरात एका सोसायटीत शिरलेल्या चोरांना अडवण्यात अयशस्वी झालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सोसायटीत शिरलेल्या चोरांची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु त्यांनी या चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यातील एक कर्मचारी चोरांना पाहून पळून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात केलेल्या अधिक चौकशीनंतर या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे. पोलीस हवालदार प्रवीण रमेश गोरे आणि पोलीस नाईक अनिल दत्तू अवघडे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य करीत असताना केलेला निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा आणि भित्रेपणा यामुळे पोलीस खात्याची जनमानसातील प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे या दोघांनाही शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून आरोपी हे मुद्देमाल, शस्त्र कटावनी आणि इतर साहित्य घेऊन जाताना दिसत आहेत. यावेळी पोलीस हवालदार प्रवीण गोरे यांनी आरोपींना पाहून दुचाकी वळवली आणि ते निघून गेले. तर, दुसऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींचे वाहन निघून जाण्याआधी गोरे हे पोलीस हवालदार अवघडे यांना एकटे सोडून निघून गेल्याचे दिसत आहे. अवघडे यांच्याकडे एसएलआर रायफल असूनही त्यांनी कोणताही प्रतिकार केला नसल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.
हेही वाचा - आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये टीम इंडियाची भरारी