पुणे - शहरात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचवेळी मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या सुध्दा वाढत आहे. बुधवारी ससून रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यातील एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 39 वर जाऊन पोचली आहे.
पुण्याच्या पर्वती येथील 38 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला 6 एप्रिलला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. भवानी पेठेतील 73 वर्षीय वृद्धाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दोन्ही रुग्णाला कोरोनसोबतच इतरही काही आजार होते. याशिवाय ससून रुग्णालयातील आणखी दोन नर्स कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगळवारी ससून रुग्णालयातील 34 वर्षीय नर्सला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. ससून रुग्णालयातील तीन नर्स कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
सध्या पुण्यात 250 हुन अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील भवानी पेठेत सर्वाधिक 85 रुग्ण सापडले आहेत. त्यापाठोपाठ कसबा, विश्रामबागवाडा परिसरात 42 रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरातील हा वाढता संसर्ग पाहता शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत.