पुणे - आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक शाखेकडून पुणे शहरासह जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मागील 35 दिवसांत जिल्ह्यात २ लाख ५१ हजार मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवले ( Pune Voters Increase ) आहे.
1 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध -
पुण्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक पुढील वर्षात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मतदान नोंदणी महत्त्वाची असणार आहे. जिल्हा निवडणूक शाखेने १ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे केवळ ३५ दिवसांत एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले आहेत.
पुण्यात 1 लाख तर पिंपरीत 75 हजार नवे मतदार -
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात १ लाख ८ हजार ७२७ नव्या मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात ७४ हजार ९९४ अणि ग्रामीण मधील १० मतदारसंघात मिळून ६७ हजार ५०४ इतक्या मतदारांनी नाव नोंदविले आहे.
पुणे ग्रामीण भागातील मतदारसंघ -
ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी जुन्नर मतदारसंघातून ५१४७, आंबेगाव २६५७, खेड आळंदी ३३९७, शिरूर ११६२२, दौड ५१४७, इंदापूर ३५९३, बारामती ३०७१, पुरंदर १४९७५, भोर ११२४१ आणि मावळ मतदारसंघातून ६६५४ असे एकूण ६७ हजार ५०४ अर्ज निवडणूक प्राप्त झाले आहेत.
मतदार यादी प्रमाणिकरण व अद्ययावतीकरण मोहीम -
पुढील वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये मतदानाचे टक्केवारीचे प्रमाणही जास्त असते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने मतदार यादी प्रमाणीकरण व अद्ययावतीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत नव्याने मतदारनोंदणी, दुबार मयत अशी मतदारांची नावे वगळणे, नाव, पत्ता आदींमधील दुरुस्ती आणि स्थलांतर असेल तर त्या मतदारसंघात नाव नोंदवणे अशी कामे करण्यात आली.
अर्जांची छानणी करण्याचे काम सुरू -
प्राप्त अर्ज ऑनलाइन आणि प्रत्यक्ष मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे करण्यात आले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील मिळून २१ विधानसभा मतदारसंघांतून २ लाख ५१ हजार २२५ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी करण्याचे काम सुरू आहे. छाननीनंतर संबंधित मतदारांची नावे अंतिम मतदारयादीत समाविष्ट केली जातील.