पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाकड परिसरात पहाटेच्या सुमारास मॉर्निंगवॉक करणाऱ्या महिलेला एका चोरट्याने हल्ला करत गळ्यातील सोन्याचे दागिने (चैन) हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, 66 वर्षीय महिलेने चोरट्याचा छत्रीने प्रतिकार करत त्याला पळवून लावले. मात्र, झटापटीत महिलेच्या गळ्याला कटरने कापले गेले आहे. यात, 66 वर्षीय महिला किरकोळ जखमी आहे. रेखा ज्ञानेश्वर गिरमे अस जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा गिरमे या दररोजप्रमाणे पहाटेच्या सुमारास मॉर्निंगवॉक करत होत्या. वाकड येथील ओमेगा सोसायटीच्या समोर येताच एक 20-22 वर्षाचा अज्ञात चोरटा त्यांचा पाठलाग करत होता. अचानक, त्याने रेखा यांच्यावर चोरीच्या उद्देशाने हल्ला करत गळ्यातील चैन काढण्याचा प्रयत्न केला. रेखा यांनी त्याचा छत्रीने प्रतिकार केला, चोरट्याने त्याला खाली पाडले अन् मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, चोरटा घटनेनंतर पळून गेला असून झटापटीत रेखा यांच्या मानेला कटर लागले. यात रेखा जखमी झाल्या आहेत. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.