पुणे - राज्य सरकारच्यावतीने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद करण्याचा निर्णय या नियमावलीत घेण्यात आल्या आहेत. निर्बंध लावल्यापासूनच व्यापाऱ्यांच्यावतीने याला विरोध होत आहे. आज पुण्यातील 50 हून अधिक व्यापारी संघटनांच्यावतीने लक्ष्मी रोड येथे मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले. सरकारनी जर कडक निर्बंध मागे घेतले नाही तर उद्या आम्ही सर्वच व्यापारी मिळून दुकाने सुरू करू असा इशारा देखील या व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
आम्ही करायचे काय
एक वर्ष आधी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आम्हा सर्व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये पगार देखील देण्यात आले आहेत. आता कुठे तरी हळूहळू पूर्वपदावर व्यवसाय सुरू होत होते. मात्र, पुन्हा लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, आम्ही करायचे काय? राज्यात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आणि व्यापाऱ्यांकडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आहे. यांना आम्ही सांभाळायचे कसे त्यांना पगार द्यायच कसा. असे अनेक प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाले आहेत. आताच्या या कडक निर्बंधामुळे आमच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. अनेक समस्यांना आम्हला सामोरे जावे लागणार आहे.
सरकारचे सर्वच नियम मान्य फक्त दुकाने सुरू करा
राज्य सरकार कडून करण्यात आलेल्या नियमावली आणि दिलेल्या सर्व आदेशांचे पालन व्यापारी वर्ग सातत्याने करत आहे. वेळेच्या बाबतीतही आम्ही सरकारला सहकार्य करत आहोत, सरकारने फक्त आमची दुकाने सुरू करावीत. सरकारच्या आदेशाचे पूर्ण पालन करण्यात येईल त्याच पद्धतीने सरकारच्या सर्व नियमांचे देखील पालन करू असे देखील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
अन्यथा दुकाने सुरू करू
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने राज्यात ब्रेक द चेन मोहिमे अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले आहे. या निर्बंधामुळे राज्यातील सर्वच दुकाने बंद करण्यात आली आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेतीलच दुकाने सुरू असणार आहेत. सरकारने आमच्यावर जो आदेश काढला आहे, तो सरकारने मागे घ्यावा. हा आदेश अत्यंत चुकीचा आदेश आहे. व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने चालू करू द्यावीत. अन्यथा परत हा व्यापारी देशोधडीला लागेल असे संघटनेने स्पष्ट केले आहे.