पुणे - लोणावळ्यात नूतन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची हळूहळू गर्दी होत असल्याचे चित्र आहे. लोणावळ्यातील प्रत्येक हॉटेलमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे. यामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. परंतु, नाईट कर्फ्यूचादेखील बऱ्याच प्रमाणावर हॉटेल व्यवसायिकांवर परिणाम जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
लोणावळ्यात नूतन वर्षाचे स्वागत करता यावे, ही सर्वांची इच्छा
लोणावळ्यात नूतन वर्षाचे स्वागत करता यावे ही प्रत्येकाची इच्छा असते. दरवर्षी त्याप्रमाणे हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. पर्यटकांनी लोणावळा शहर आणि परिसर अक्षरशः फुलून जातो. यावर्षी कोरोनाचा काही प्रमाणात परिणाम जाणवत असून लोणावळ्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. याचा फारसा परिणाम पर्यटकांवर दिसत नाही. लोणावळ्यातील हॉटेल्समध्ये पर्यटकांनी गर्दी केली असून हॉटेलबाहेर अनेक पर्यटक थांबलेले दिसत आहेत.
स्थानिक पोलिसांनी कसली कंबर
ख्रिसमस, नाताळ सणाच्या दिवशी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी पाहायला मिळाली. तशीच परिस्थिती ही नूतन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक लोणावळा पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. रात्रीचे 11 वाजताच सर्व हॉटेल्स बंद करण्यात येत आहेत, अशी खबरदारी पोलीस घेत आहेत.