पुणे - राज्यात पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्राच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
कोकण आणि मराठवाड्यात तीन दिवस जोरदार -
कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज (सोमवार) पावसाची नोंद झाली. कोकण आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार, तर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
पुण्यात दीड तास धुव्वाधार -
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये प्रचंड पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच शेतीचेही मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात उकळत असल्याने रात्री साडे सहाच्या सुमारास शहरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली होती. शहरात दीड तास धुव्वाधार पाऊस झाला असून सध्या पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे.
शहरात अनेक रस्त्यांवर साचले पाणी -
गेल्या एक ते दीड तासांपासून होत असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहे. काही रस्त्यांवरतर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शहरातील अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती.
हेही वाचा - कर्तव्यपारायणता.. लसीकरणासाठी आरोग्य सेविकेने पुराच्या पाण्यातून काढली वाट, व्हिडिओ व्हायरल