पुणे - 10 ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. पुण्यातील ससून रुग्णालयात मनोविकृतीशास्त्र विभाग हा खूप जुना विभाग आहे. या विभागात राज्यातील विविध जिल्ह्यातून रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. ससून रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागात दररोज साधारणतः 150 ते 200 रुग्ण तपासणीसाठी येत असतात. रुग्णांना विविध प्रकारचे औषधोपचार तसेच मार्गदर्शन, सायकोथेरपी, डेकेअर सेंटर या प्रकारची सुविधा देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर येथे आंतररुग्ण विभाग असून 30 ते 40 रुग्ण हे भरती होऊ शकतात. तसेच समाजात त्यांना पून्हा उभे राहण्यासाठी मदत देखील केली जाते. ससून रुग्णालयात राज्यभरातून रुग्ण येत असतात. तर बीड, परभणी, नांदेड येथून अधिक रुग्ण येत असतात, अशी माहिती ससून रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख नाशिकांत थोरात यांनी दिली
समाजात गैरसमज अधिक -
मनोविकार किंवा मानसिक रुग्ण म्हटले की हे रुग्ण काहीही करतात. सर्वसामान्य नागरिक तसेच त्या रुग्णाचे नातेवाईक त्याला जवळ करत नाही. विशेष म्हणजे या आजाराबाबत असेही गैरसमज आहे की हा आजार नसून कोणीतरी बुवाबाजी किंवा जादूटोणा केला आहे, अशी गैरसमज करून रुग्ण डॉक्टरांजवळ पोहचत नाही. मात्र जेव्हा पोहोचतात तेव्ह खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे अशा मानसिक त्रास असलेल्या रुग्णांनी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन थोरात यांनी केले आहे.
जनजागृतीसाठी मानवी साखळीचे आयोजन -
10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने पुण्यातील बी.जे मेडिकल रुग्णालयाच्यावतीने जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येतो. त्याचप्रमाणे मनोविकृतीशास्त्र विभाग बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था यांच्यातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात जनजागृतीसाठी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.