पिंपरी-चिंचवड - शस्त्राचा धाक दाखवून लुटल्यानंतर परिसरातील दहा वाहनांची तोडफोड केल्याची घटना निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर येथे घडली आहे. या प्रकरणी तीन जणांना निगडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोकोबा शिंदे, यश हरी घोंगडे, संदीप प्रेमचंद गोलेछा, आकाश उर्फ छोट्या खडका, तुषार शेंडगे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत रबलजेदंसिंग जागरसिंग सोही यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी ट्रान्सपोर्ट नगर येथील एका ढाब्यासमोर थांबले होते. त्यावेळी पाच आरोपी कोयते आणि लाकडी दांडके घेऊन फिर्यादी यांच्याजवळ आले. फिर्यादी यांना शस्त्राचा धाक दाखवून बळजबरीने त्यांच्या खिशातून अडीच हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर ढाब्याच्या आजूबाजूला उभ्या केलेल्या दहा टेम्पो आणि ट्रकच्या काचा फोडून 50 हजारांचे नुकसान केले. तसेच आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
हेही वाचा - नाशकात पोलीस असल्याचे सांगून भररस्त्यात महिलेची लूट; चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद