पुणे : वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला तीन लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातला ( Fraud of Rs 3 Lakh for Medical Admission ) आहे. याप्रकरणी मंगळवार पेठेतील एका 50 वर्षीय व्यावसायिकाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एप्रिल 2022 या कालावधीत ऑनलाईन माध्यमाद्वारे घडली आहे.
जाहिरात पाहून केला संपर्क : व्यावसायिक मंगळवार पेठेत राहायला आहेत. ते आपल्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालायत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यांनी समाजमाध्यमावर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाबाबतची जाहिरात पाहिली होती. त्यानंतर व्यावसायिकाने जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी चोरट्यांनी व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
अशा पद्धतीने केली फसवणूक : सुरुवातीला तीन लाख रुपये जमा करावे लागतील, अशी बतावणी चोरट्यांनी केली. चोरट्यांनी एका खासगी बँकेतील खात्याचा क्रमांक दिला. व्यावसायिकाने आरोपीने सांगितलेल्या खात्यात रक्कम जमा केली. त्यानंतर व्यावसायिकाने चोरट्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता मोबाईल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. संबंधित तक्रार अर्जाद्वारे गुन्हा दाखल करून समर्थ पोलिस ठाण्याकडे तपासासाठी सोपविण्यात आला.
हेही वाचा : PMC Online Fraud : ऑनलाइन फसवणुकीचे जाळे आता पुणे महापालिकेत, अधिकाऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक