पुणे - ज्या नागरिकांनी दोन लस घेतल्या आहेत, अशा नागरिकांना फिरण्याची मुभा देण्याचा विचार असून यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्पष्ट केले. तसेच, राज्याला लस उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प होत असल्याचेही ते म्हणाले.
दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार सूट?
अजित पवार म्हणाले की, ज्यांनी दोन लस घेतल्या आहेत, अशा नागरिकांना टप्या-टप्प्याने बाहेर फिरण्याची मुभा देण्याचा विचार आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. काही जणांचे म्हणणे आहे की, इथून पुढे 100 ते 120 दिवस खूप म्हत्वाचे आहेत. या दिवसांमध्ये नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. परंतु, ग्रामीण भागात मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विनामास्क नागरिक फिरत असल्याचे चित्र आहे. एक बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकतो. सर्वांनी नियम पाळले पाहिजेत, अस अजित पवार म्हणाले.
फोन टॅपिंग प्रकरणी कुठे तरी पाणी मुरत आहे
फोन टॅपिंग प्रकरणावरही अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, प्रत्येकाला त्यांची प्रायव्हसी मिळाली पाहिजे. एखाद्या व्यक्तीमुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असेल किंवा देशद्रोही काम होत असेल, तर याबाबत त्या-त्या देशाला अधिकार आहे की बारकाईने या गोष्टी पुढे आणल्या पाहिजेत. नियम आणि कायदे आहेत, त्याचा आधार घेऊन निष्पाप लोकांना भरडले जाते असल्याच्या घटना अनेक देशांत पुढे आल्या आहेत. टॅपिंगबाबत सत्ताधारी पक्षाचे वेगळे मत आहे. विरोधी पक्षाची वेगळी भूमिका आहे. एकमेकांना टोलवाटोलवी सुरू आहे. एकदम बातमी पुढे आली, याचा अर्थ कुठे तरी पाणी मुरत आहे. याला निश्चितपणे जागा राहत आहे. आज पार्लमेंट चालू आहे. त्या माध्यमातून देशातील सव्वाशे कोटी जनतेला नक्की काय झाले? कोणाच्या काळात झाले? कोण जबाबदार आहे? कोणी आदेश दिले? हे कळले पाहिजे. आपल्यातील महत्वाच्या लोकांबद्दल माहिती परदेशात गेली तर तो देखील धोका देशाला आणि त्या व्यक्तीला आहे. त्यामुळे, ही गोष्ट राजकारण न आणता अतिशय गांभीर्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने घेतली पाहिजे.
महाराष्ट्रात लस उपलब्ध होत नाही
लसीकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील लसीकरणाचा वेग मंदावलेला नाही. लस देणे केंद्राच्या हातात आहे. जेवढी लस मिळत आहे, तेवढी आपण देत आहोत. मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे हीच मागणी करत आहेत की, राज्याची लोकसंख्या पाहून लस द्यावी. यामुळे लसीकरण बंद होणार नाही. नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही. जुलैपासून सिरम आणि भारत बायोटेकमध्ये लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होईल. त्यांच्यामधून ज्या राज्याची डिमांड असेल तेवढी लस मिळेल, अस सांगितले होते. आज तारीख 21 आहे. मात्र, अद्यापही लस उपलब्ध झालेली नाही. आपण रोज 15-25 लाख नागरिकांना लस देऊ शकतो एवढी क्षमता आहे. सर्वांनी पुढाकार घेतला तर 40-50 लाख लसीकरण होईल. पण, तेवढी लस उपलब्ध झाली पाहिजे. बाहेरच्या लसीला पण मर्यादा पडतात. दोन लसीला परवानगी दिलेली आहे. डब्ल्यूएचओचे वेगवेगळ्या लसींसंदर्भात मत वेगळे आहे. देशातील नागरिकांची मानसिकता लस घेतली पाहिजे, अशी तयार झाली आहे. पूर्वी पळून जायचे, पुढे येत नव्हते, आता ती दूर झाली आहे.
हेही वाचा - पेगासस प्रकरण खरे असेल तर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा - नाना पटोले