पुणे - गगनयान ही भारताची आतापर्यंतची सर्वात महत्त्वकांक्षी अवकाश मोहिम आहे. या मोहिमेतील गगनयान आता आकाशात झेपवण्यास सज्ज झाले आहे. सलग १८ महिने अहोरात्र मेहनत घेऊन हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. येत्या १८ डिसेंबरला विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे संचालक एस.सोमनाथ व इस्त्रोच्या शास्त्रज्ञाच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील कंपनीच्या आवारात ऑनलाइन पद्धतीने यानाच्या बुस्टरचे उद्घाटन होणार आहे.
वालचंदनगर येथील कंपनीने निर्माण केलेल्या बूस्टरचा व्यास ३.३ मीटर व उंची २० मीटर आहे. यामध्ये नोझलएन्ड सेगमेंट, हेडएन्ड सेगमेंट व मिडल सेगमेंटचा समावेश आहे. बूस्टरची चाचणी करताना अतिशक्तिशाली दाबाद्वारे चाचणी करण्यात येणार आहे. गगनयान आकाशात उड्डान करतेवेळी ६ बूस्टर कार्यरत असणार आहेत.
गगनयानाची वैशिष्ट्ये -
आकाशात झेपावणार्या इतर यानांपेक्षा गगनयान वेगळे आहे. या गगनयानात तीन अंतराळवीर आकाशात झेपावणार आहेत. या यानाच्या उड्डानावेळी काही बिघाड झाल्यास अंतराळवीरांना यानापासून तात्काळ वेगळे करणारे क्यू.एस. के.एफ हे उपकरण असणार आहे. त्याचे काम वालचंदनगरच्या कंपनीत सुरू आहे.
काय आहे 'गगनयान' मोहीम..?
अवकाशात अंतराळवीर पाठवण्यासाठी इस्रो गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहे. या मोहिमेसाठी कधी तांत्रिक अडथळे आले, तर कधी निधीची कमतरता. या सर्व अडथळ्यांनंतर, अखेर २०१८ च्या डिसेंबर महिन्यात या मोहिमेला सरकारकडून परवानगी मिळाली. तसेच, १० हजार कोटींचा निधीदेखील इस्रोला देण्यात आला. त्यानंतर महिनाभरातच इस्रोने बंगळुरूमध्ये मानवी अंतराळ उड्डाण केंद्राची (ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर) स्थापना केली. या मोहिमेअंतर्गत, तीन अंतराळवीरांना सात दिवसांसाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. २०२१च्या डिसेंबरमध्ये ही मोहीम राबवण्याचा इस्रोचा मानस आहे.