पुणे - राज्यात फोन टॅपिंग प्रकरण चांगलचं चर्चेत आलं आहे. या प्रकरणावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील. त्याला माझा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अहवाल दिला तो सर्वानी आता पाहिला आहे. कुंटे हे सक्षम चांगले अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी विस्तृत अहवाल दिला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ते पुण्यात बोलत होते.
विरोधकांना कुठलीही माहिती मिळाली की ते आरोप करतात. मात्र सत्ताधाऱ्यांना सर्व शहानिशा करून उत्तरे द्यावी लागतात, असे अजित पवार म्हणाले. अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबत जे आरोप होत आहेत. मुळात तसे झालेलेचं नाही. मुख्य सचिवांच्या अहवालातून या बाबतची वस्तूस्थिती समोर आली आहे. दुसरीकडे वाझे प्रकरणात चौकशी सुरू आहे. यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. विरोधी पक्ष हे सत्ता हातातून गेल्याने सतत राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत. महाराष्ट्रात अशी काही गंभीर परिस्थिती नाही. महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीकडे 165 चे बहुमत आहे, असे अजित पवार म्हणाले.
दीपाली चव्हाण आत्महत्येचा सखोल तपास-
दीपाली चव्हाण प्रकरणात सखोल चौकशी केली जाईल आणि या आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे, हे तपासून जर कोणी दोषी असेल तर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे अजित पवार म्हणाले.
राज्यात जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. आता 45 वर्षाच्या पुढच्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र या दुसऱ्या लाटेत तरुण नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आल्याचे दिसून येते आहे. पहिल्या लाटेत 60 आणि त्यापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका अधिक होता, मात्र आता तसे काही राहिलेले नाही, त्यामुळे लसीकरण करताना 25 च्या वरील सर्वांनाच लसीकरण केले जावे, अशी आमची भूमिका आहे आणि याबाबत केंद्र सरकरकडे मागणी केली असल्याचे अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रात टेस्टिंग जास्त केले जात आहेत. मात्र पहिल्या कोरोनाच्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटेत टेस्टिंग केलेल्यांपैकी पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे, असेही अजित पवार म्हणाले.
माझे फोटो पाहून कोणी लस घेणार नाही-
तुम्ही लस घेतलीय का, असे विचारले असता मी देखील लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र मी काही फोटो वगैरे काढला नाही. मला काही तशी नौटंकी जमत नाही, असे सांगत इतरांनी लस घेतल्याचे फोटो टाकले तर लोक ते बघून लस घेतील, मात्र मी लस घेतल्याचे फोटो टाकले तर कोणी लस घेणार नाही, असे अजित पवार गमतीत म्हणाले.
हेही वाचा- सरकारने खुशाल चौकशी करावी, आम्ही पुरावे न्यायालयात सादर करू - फडणवीस