पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत आग लागलेल्या इमारतीची पाहणी केली. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. सीरमला लागलेल्या आगीत कोरोना लसीचे कोणतेही नुकसान झाले नसून ही आग घात की अपघात हे चौकशीनंतर कळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
- आगीचा लसीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत आग लागलेल्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सीरममध्ये आग लागल्याच्या बातमीने काळजाचा ठोका चुकला होता. दुर्दैवाने 5 जणांचा मृत्यू झाला. परंतु ज्या ठिकाणी कोविशिल्ड लसीचे उत्पादन सुरू आहे, तिथे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. तसेच सीरमला लागलेल्या आगीचा लसीकरणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही ते म्हणाले.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सीरममधील घटनास्थळाची पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युट ला भेट देत आग लागलेल्या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार गिरीश बापट, आमदार चेतन तुपे, सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला तसेच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित होते. कोरोनावरील कोविशिल्ड लसीचे उत्पादन करत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागली होती. सीरम इन्स्टिट्यूटच्या युनिट 1 मधील इमारतीचे काम सुरू असताना यात आग लागली आणि दोन मजले जळून खाक झाले होते, तर 5 कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली.
- नीलम गोऱ्हे यांनी सीरममधील घटनास्थळाची केली पाहणी
सीरम इन्स्टिट्यूटच्या आग लागलेल्या इमारतीचे फायर ऑडिट झालेले होते. आता पुन्हा करण्यात येत आहे. आग लागल्यानंतर काही वेळातच पाण्याचे फवारे असलेली यंत्रणा सुरू झाली होती, असे गोऱ्हे म्हणाल्या. काही लोक या घटनेबाबत शंका घेतायेत, त्यांनी त्यांच्या जवळ काही पुरावे असतील तर द्यावे उगाच अफवा पसरवू नये, असे त्यांनी सांगितले. कोविशिल्ड उत्पादनावर कुठलाही परिणाम नाही, घटनेमुळे इथले कर्मचारी, शास्त्रज्ञ यांच्या मनोबलावर कुठलाही परिणाम झालेला नाही अस देखील गोऱ्हे यावेळी म्हणाल्या
- एकदा गेला तो पुन्हा आलाच नाही
प्रतीक काल कामावर जाण्याअगोदर चावी देण्यासाठी दुकानावर आला होता. काम पूर्ण करून लवकर घरी येतो, असे सांगून तो गेला होता. मला येऊपर्यंत तू हळू-हळू काम कर, असेही सांगून गेला. मात्र, तो गेला तर परत आलाच नाही, असा आक्रोश त्याच्या आईने केला आहे. पुण्यातील प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक-14मध्ये प्रतीक आपली आई, वडील आणि छोट्या भावासोबत राहत होता. त्याचे वडील सध्या रुग्णालयात अॅडमिट आहेत. हातावर पोट असणारे हे कुटुंब आहे. त्याचा छोटा भाऊ पंधरा वर्षे वयाचा आहे तर, त्याची आई प्रभात रस्त्यावर चहाचे स्टॉल चालवते. प्रतीकने नुकतेच आपले शिक्षण पूर्ण करून कामाला सुरुवात केली होती. आपल्या कुटुंबाचा तो आधार बनू पाहत होता. परंतु, सीरममधील दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी तो महेंद्र इंगळे या आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यासोबत सीरम इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही.
- सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत अकोल्याच्या युवकाचा मृत्यू
पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला होता. या पाच जणांमध्ये अकोल्यातील चांदूर येथील महेंद्र प्रकाश इंगळे यांचा समावेश आहे. महेंद्र इंगळे यांचा मृतदेह त्याच्या चांदूर गावी आणण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. महेंद्रचा मृत्यू ग्रामस्थांना व मित्रांना हेलावून टाकणारा ठरला आहे. महेंद्र हा सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीच्या मेंटन्ससाठी गेला होता.
- मृतांच्या नातेवाईकांना सीरमकडून प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाखांची मदत सीरम इन्स्टिट्यूटकडून जाहीर करण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटसाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कंपनीच्या निर्धारित नियमांच्या पलिकडे जाऊन दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाखांची मदत जाहीर करत आहोत, असं सीरमचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावला यांनी म्हटले आहे.
- आग लागलेल्या इमारतीत कोव्हिशिल्डचे उत्पादन नाही
जिथे कोरोनाची लस बनवण्याचे काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचे काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.
- वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली असल्याची शक्यता
सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सीरमच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागली होती. तसेच मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे.इमारतीचे काम सुरू होते. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली असल्याची शक्यता राजेश टोपे यांनी वर्तवली आहे.
- तपास यंत्रणा केंद्रीय गृह मंत्रालयाला देणार अहवाल
कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे नाव हे आता जगभर झाले आहे. त्यामुळे यात घातपाताच्या शक्यतेबाबत तपास यंत्रणा तपास करतील आणि या आगीसंदर्भातला सविस्तर अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर करतील.
- आगीत मृत्यू झालेल्यांची नावे
सीरम इन्स्टिट्यूटमधल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून, यात चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हे सर्व मृतदेह नोबेल हॉस्पिटलमध्ये नेले आहेत. यातील दोघेजण हे मूळचे उत्तरप्रदेशचे असून, एकजण बिहार आणि दोघेजण हे पुण्यातील होते.
1) रामा शंकर हारिजण ( रा. उत्तरप्रदेश)
2) बिपीन सरोजी (रा. उत्तरप्रदेश)
3) सुशीलकुमार पांड्ये ( रा. बिहार)
4) महेंद्र इंगळे (रा. पुणे)
5) प्रतिक पास्त (रा. पुणे)
- सीरममध्ये तयार झाली कोविशिल्ड लस!
लस निर्मितीमध्ये पुण्यातील सीरम कंपनी जगभरात आघाडीवर आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर सीरम कंपनीने लस निर्मितीसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका फार्मा कंपनीसोबत सहकार्य केले. त्यानुसार लसीवर संयुक्तपणे संशोधन करण्यात आले. सोबतच सीरम कंपनीत मोठ्या प्रमाणात लस निर्मिती करण्याची क्षमता आहे. त्यामुळे कोरोना लसीचे उत्पादन सीरमच्या फॅसिलिटीतच करण्यात येत आहे. कंपनीने लसीला परवाना मिळण्यासाधीच कोट्यवधी डोस तयार करून ठेवले होते. ही लस शीतगृहात ठेवाली लागते. त्यामुळे त्यासाठी खर्च येतो. आता लसीचा पुरवठा करताना कोल्ड स्टोरेजमधूनच लस देशातील विविध शहरात पोहचवण्यात येत आहे.
हेही वाचा - 'एकदा गेला तो पुन्हा आलाच नाही'; सिरममध्ये मृत्यू झालेल्या प्रतीकच्या आईचा आक्रोश
हेही वाचा - 'सीरम'कडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाखांची मदत; पुनावालांची घोषणा