पुणे - पिंपरीतील भैरवनाथ मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहसनास्थ पुतळ्याचे नूतनीकरण करण्यासाठी विविध सरकारी विभागांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्याचा पूर्णाकृती पुतळा बदलून नवा पुतळा बसविण्याचा पिंपरी महापालिकेचा मार्ग मोकळा होणार आहे.
मागील काही वर्षांपासून पिंपरीतील भैरवनाथ मंदिरासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण रखडलेले आहे. याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व स्थानिक नगरसेविका उषा वाघेरे यांनी सरकारी विभागांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर नवीन आराखड्यात नूतनीकरणासाठी सरकारी परवानगी मिळाली आहे. यामध्ये कलासंचलनालय मुंबई, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ मुंबई, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी, पुणे या विभागांची परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या कामाची निविदा काढण्यासाठी महानगरपालिकेने संमती दिली आहे.
भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहसनास्थ पुतळ्यासह आराखड्यामुळे पिंपरीच्या वैभवात भर पडणार आहे. मराठी मातीचा स्वाभिमान जपत शिवछत्रपतींच्या विचारांना तरुण पिढीत नव्याने रुजवण्यासाठी हे कार्य मोलाचे ठरेल, असे मत नगरसेविका उषा वाघेरे यांनी व्यक्त केले आहे.