पुणे - राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून खासगी बस या एसटी डेपोमधून सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांकडून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा, आमचे विलीनीकरण करावे, अशी मागणी आंदोलकांकडून जोर धरू लागली आहे.
'लवकरात लवकर मागण्या मान्य करा'
गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला आश्वासनावर आश्वासने मिळत आहे. कोणीही आमच्या मागण्यांचा विचार करत नाही. मागच्या सरकारनेदेखील आम्हाला आश्वासने दिली होती. मात्र आता कामगारांच्या वतीने जे आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्या आंदोलनात जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन अशा पद्धतीने सुरू राहणार आहे.
'सरकारकडून संप मोडीत काढण्याचा प्रयत्न'
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांची होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागाने सर्व खासगी प्रवासी बसेस, शाळेच्या बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास संप मागे घेईपर्यंत मान्यता दिली आहे.