पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ( 17 जून ) जाहीर झाला. या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं आहे. राज्यात 122 विद्यार्थी असे आहेत, ज्यांना 100 पैकी 100 मार्क मिळाले आहेत. त्यातच पुण्यातील गुरुवार पेठेतील लोहियानगर येथे राहणाऱ्या शुभम जाधव हा विद्यार्थी सर्व विषयांत 35 गुण मिळवत 'काठावर पास' झाला ( Shubham Jadhav All Subject 35 Mark SSC Result ) आहे.
शुभम हा पुण्यातील न्यू इंग्लिश रमणबाग येथे शिक्षत घेत होता. शुभमच्या घरची परीस्थिती तशी बेताचीच. वडील राहुल जाधव रोजंदारीचे काम करत असून, आई संगीता जाधव या केअर टेकर म्हणून काम करतात. शुभमही शिक्षणासोबत काम करत होता. त्यामुळे त्याचं अभ्यास कमी झाल्या त्याला 35 गुण मिळाले.
याबाबत बोलताना शुभम म्हणाला की, मी गेल्या दोन वर्षापासून शाळेबरोबर काम करत होतो. आई-वडिलांना काहीतरी मदत व्हावी म्हणून मी काम करत होतो. मला असं वाटल होत की चांगले मार्क मिळतील. पण, जेव्हा मी निकाल बघितला तेव्हा मला विश्वास बसला नाही. मला सर्वच विषयांत 35 गुण मिळाले आहे. भविष्यात मला चांगला अभ्यास करुन पोलीस बनायचे आहे. यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असेही त्याने सांगितलं.
शुभमचा आज निकाल आहे, हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला वाटल ही नव्हत की तो पास होईल. पण, जेव्हा त्याचा निकाल माझ्या मोठ्या मुलाने मला पाठवला, तेव्हा मी बघितलं आणि मला धक्का बसला. एक बाप म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजी होती ती मी घेतली नाही. परंतु, येणाऱ्या काळात मी वडील म्हणून ही जबाबदारी नक्की पूर्ण करेल, असं शुभमचे वडील राहुल जाधव यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - SSC Result Declared : दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी, तर 'या' विभागाचा निकाल सर्वाधिक